स्वातंत्र्यानंतरच्या भारताविषयीच्या अपेक्षा आणि सद्यःस्थिती !
‘स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘परवशात पाश दैवी ज्याच्या गळा लागला असुनी खास मालक घराचा म्हणती चोर त्याला’, असे परकियांना उद्देशून एक नाट्यगीत रचले होते. हा पाश वर्ष १९४७ मध्ये दूर झाला. पूर्वीच्या शासनकर्त्यांकडून नोकरशाही, न्यायपालिका, शिक्षणपद्धत, आरोग्ययंत्रणा, प्रसारमाध्यमे, रोजगाराच्या संधी, नद्या, जंगले, समुद्रकिनारे, देशातील प्रमुख शहरे यांविषयी जनतेच्या पुष्कळ अपेक्षा होत्या. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांनाही या अपेक्षा अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
१. शासनकर्ते किंवा राजकीय नेते
शासनकर्ते किंवा राजकीय नेते यांनी जनतेचे सेवक म्हणून वावरावे, अशी अपेक्षा होती; परंतु ते जनतेचे मालक असल्यासारखे वागत आहेत.
२. नोकरशाही
नोकरशाहीने जनतेशी आपुलकीने वागावे आणि त्यांचे दायित्व उचलावे, ही अपेक्षा होती; पण सध्या ते जनतेशी संवेदनाशून्यतेने वागत असून कामाचे दायित्व उचलायचे टाळत आहेत. ते पाट्याटाकूपणा करणारे झाले आहेत.
३. न्यायपालिका
न्यायपालिकेकडून सर्वसामान्य जनतेला जलद गतीने खटले निकालात काढले जातील, अशी अपेक्षा होती. याउलट न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहातात.
४. आरोग्यसेवा
सर्वसामान्य जनतेला (गोरगरीब जनतेला) वैद्यकीय सेवा विनाशुल्क आणि त्वरित उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती; मात्र ती गरिबांपेक्षा श्रीमंतांसाठीच अधिक उपलब्ध आहे.
५. शिक्षणपद्धत
भारतात १४ विद्या ६४ कला शिकून राष्ट्र आणि धर्म यांचे हित जपणारे, राष्ट्रप्रेम अन् राष्ट्राभिमान असणारे सुजाण, तसेच कर्तबगार नागरिक निर्माण होतील, अशी अपेक्षा होती; परंतु परकियांच्या शिक्षणपद्धतीचे अनुकरण केल्याने भारताच्या युवाशक्तीला शिक्षण अन् रोजगार यांच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत आणि भविष्यही उज्ज्वल नाही.
६. प्रसारमाध्यमे
प्रसारमाध्यमांनी निर्भय आणि नि:पक्षपाती वृत्तसंकलन करावे, अशी अपेक्षा होती; परंतु सध्या ती धनशक्ती आणि राजकीय शक्ती यांच्या पुढे शरण गेलेली नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
७. पर्यावरण
भारतात नद्या, जंगले आणि समुद्रकिनारे यांचे पर्यावरणदृष्ट्या संरक्षण होईल, ही अपेक्षा होती; परंतु सद्यःस्थितीत नद्या गाळाने भरल्या आहेत, जंगले नष्ट होत आहेत, तसेच समुद्रकिनार्यावर प्लास्टिकचा कचरा साचलेला आहे. मुंबई, कोलकाता, देहली, चेन्नई आदी प्रमुख शहरे देशाची आभूषणे होती. ती प्रदूषणविरहित रहातील, अशी अपेक्षा होती; परंतु सध्या तेथील हवा आणि पाणी इतके प्रदूषित झाले आहे की, तेथे वास्तव्य करणे धोकादायक बनले आहे.
‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) अशा व्यापक विचाराने समाज नांदेल, अशी अपेक्षा होती; परंतु सध्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्यांक समाजाचे लांगूलचालन केले जात असून बहुसंख्य हिंदु समाजामध्ये दुही निर्माण केली जात आहे.’
– श्री. वीरेश पांडुरंग ठाकूर, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.