‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’चे प्रत्यक्ष आचरण करणारे लालबहादूर शास्त्री !
उद्या (२ ऑक्टोबर २०२२ या दिवशी) लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन…!
देशाची निष्काम सेवा हा लालबहादूर शास्त्रीजींच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांच्या तेजस्वी जीवनातील प्रेरक प्रसंग आजही सर्वांना प्रेरणा देणारे आहेत.
१. प्रसिद्धीपराङ्मुखता
एकदा गोविंद वल्लभपंतांनी शास्त्रीजींना विचारले, ‘‘शास्त्रीजी, आपण स्तुतीच्या प्रसंगी पुढे का येत नाही ?’’ याचे उत्तर देतांना लालबहादूर म्हणाले, ‘‘जेव्हा मी आगर्याहला रहात होतो, तेव्हा लाला लजपतरायांनी ताजमहालकडे बोट दाखवून मला म्हटले, ‘या इमारतीत २ प्रकारचे दगड आहेत, एक नक्षीदार चमकणारे आणि दुसरे पायातील न दिसणारे; पण ही इमारत उभी आहे, ती पायातील दगडांवर !’ त्याच वेळी मी पायातील दगड व्हायचे ठरवले.’’
२. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’चे प्रत्यक्ष आचरण
‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ हे शास्त्रीजींचे ब्रीद होते. ते त्यांनी जन्मभर पाळले. पंतप्रधान असतांना एकदा ते एक कापड गिरणी पहायला गेले. गिरणी मालकांनी त्यांना निरनिराळ्या भारी किंमतीच्या साड्या दाखवल्या. साड्यांच्या किंमती ५०० रुपयांच्या खाली नव्हत्या. शास्त्रीजी साड्यांच्या किंमती पाहून म्हणाले, ‘‘अहो मी गरीब माणूस आहे. एवढ्या महागाच्या साड्या मी खरेदी करू शकत नाही.’’ गिरणी मालक म्हणाले, ‘‘आपण किंमतीची काळजी करू नका. आम्ही तुम्हाला या साड्या भेट म्हणून देऊ इच्छितो. आपण आमच्या देशाचे पंतप्रधान आहात ना !’’ तेव्हा शास्त्रीजी ठामपणे म्हणाले, ‘‘मी प्रधानमंत्री अवश्य आहे; पण याचा अर्थ असा नव्हे की, जी वस्तू मी स्वतःच्या पैशांनी विकत घेऊ शकत नाही, ती घेऊन माझ्या पत्नीला द्यावी, हे योग्य नाही. ‘मी प्रधानमंत्री असलो, तरी गरीब आहे’, हे आपण कसे विसरता ? म्हणून मला परवडतील, अशाच साड्या दाखवा.’’ त्यामुळे गिरणी मालकाची विनवणी फुकट गेली. त्याला शास्त्रीजींना स्वस्त साड्या दाखवाव्या लागल्या. एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः पैसे देऊन आपल्या कुटुंबियांसाठी साड्या खरेदी केल्या.
३. जनतेचे आदर्श सेवक
शास्त्रीजी स्वतःला जनतेचे मालक नव्हे, तर सेवक समजत होते. राजस्थान दौर्यालच्या वेळचा हा एक प्रसंग आहे. पंतप्रधान या नात्याने ते नागौर जिल्ह्याच्या दौर्याचवर होते. त्यांच्यासमवेत नेते आणि अधिकारी यांची बरीच गर्दी होती. शास्त्रीजींनी त्यांना सांगितले, ‘‘थोडा वेळ मी एकटेच फिरू इच्छितो.’’ ते फिरत-फिरत बरेच लांब गेले. वाटेत पंतप्रधानांच्या दौर्यारची व्यवस्था ठेवण्यासाठी नेमलेल्या हवालदारांपैकी एक जण त्यांना भेटला. त्याला ते म्हणाले, ‘‘हवालदारसाहेब, काही गुंडांनी माझे सामान पळवले आहे. कृपा करून त्याचा शोध घेऊन माझे सामान मला परत मिळवून द्या.’’ हवालदार म्हणाला, ‘‘अरे जा, म्हातार्यां ! तुला तुझ्या सामानाची फिकीर पडली आहे ! दिसत नाही का ? आम्ही पंतप्रधानांच्या दौर्याधच्या व्यवस्थेत आहोत ते ! चल पळ इथून. नाहीतर कोठडीत बंद करीन, म्हणजे आपोआप सामान आणि पैसे विसरशील.’’ त्याच वेळी काही स्थानिक नेते तेथून निघाले होते. त्यांनी शास्त्रीजींना पाहून त्यांचे आगत-स्वागत करण्यास आरंभ केला. हे पहाताच हवालदाराच्या तोंडचे पाणी पळाले. तो थरथर कापू लागला. आपल्या चुकीची क्षमा मागून तो लोटांगण घालून म्हणाला, ‘‘साहेब, मी आपल्याला ओळखले नाही.’’
शास्त्रीजी त्याची पाठ थोपटत म्हणाले, ‘‘घाबरू नको ! तू मला ओळखले नाहीस, यात तुझा काही दोष नाही; पण ‘तू या देशाच्या नागरिकाला ओळखले नाहीस’, हा तुझा गुन्हा आहे. देशाचा नागरिक तुझा मालक आहे. तुम्ही-आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यांच्या घामाच्या कमाईवर तुला आणि मला वेतन मिळते. तू पंतप्रधानांचा चाकर नसून जनतेचा चाकर आहेस; म्हणून आपल्या खर्याल मालकाला ओळख. लक्षात ठेव, यातच तुझे कल्याण आणि कर्तव्य आहे.’’
शास्त्रीजींचे हे शब्द ऐकून जमलेल्या लोकांचे डोळे भरून आले. शास्त्रीजींच्या मोठेपणाची ते आपापसात मनःपूर्वक प्रशंसा करू लागले.
४. त्याग आणि कष्ट करून देशासाठी समर्पित केलेले जीवन शास्त्रीजींचे जीवन
लहानपणापासूनच त्याग आणि कष्ट यांनी भरलेले होते; पण यांमुळे ते त्यांच्या ध्येयापासून कधीच विचलित झाले नाहीत; कारण
मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं न च सुखम् । – भर्तुहरिकृत नीतीशतक, श्लोक ८२
अर्थ : कार्य करू इच्छिणारा दृढनिश्चयी मनुष्य सुख-दुःखांची पर्वा करत नाही.
मनस्वी लोकांना वाटते की, संघर्षामुळेच व्यक्तीविकासाला संधी मिळते. १५ वर्षांच्या राजनैतिक जीवनात ते ९ वर्षे कारागृहात राहिले. त्या वेळी त्यांनी कधी सवलती मागितल्या नाहीत कि तत्त्वांशी तडजोड केली नाही. वास्तविक ते स्वतःसाठी कधी जगलेच नाहीत. देशासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले होते. विशेषतः सध्याच्या मूल्यहीन आणि स्वार्थप्रेरित राजकारणात त्यांच्या जीवनातील प्रसंग दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. आजचे नेते लालबहादूर शास्त्रीजींचा आदर्श स्वीकारतील, तर देशाचा कायापालट घडल्याविना रहाणार नाही.’
– गोवर्धनलाल पुरोहित (साभार – ‘हिंदी डायजेस्ट नवनीत’ (ऑक्टोबर ९७), अनुवाद – वि.गो. देसाई)