नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
अपप्रचार : ‘मातीत खते घातल्याविना उत्पन्न येणार नाही.
खंडण : जंगलात कोण खत द्यायला जाते; परंतु तेथेही झाडांना भरपूर फुले आणि फळे येतच असतात. झाडाची वाढ ही निसर्गात सहज होणारी प्रक्रिया आहे. झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व खनिजे मातीत असतात; परंतु झाडांना ती थेट मातीतून घेता येत नाहीत. मातीतील जीवाणू झाडांना आवश्यक ती पोषक तत्त्वे मुळांशी उपलब्ध करून देतात. वनस्पतीच्या वाढीसाठी कुठेही मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. मातीमध्ये जेवढे अधिक जीवाणू तेवढी झाडांची मातीतील पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या ‘जीवामृता’चा प्रसार केला. ‘जीवामृत’ हे अशा जिवाणूंचे उत्तम विरजण (कल्चर) आहे. जिवामृताच्या नियमित उपयोगाने मातीच्या सुपिकतेत वाढ होत राहते. आजकाल नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे अनेक शेतकरी कोणतेही रासायनिक खत न वापरता केवळ जिवामृताचा वापर करून विक्रमी पीक घेत आहेत. हे पाहिल्यावर ‘खते घातल्याविना पीक येत नाही’, असे कृषी विद्यापिठे वर्षानुवर्षे का सांगत आली आहेत ? हे लक्षात येत नाही. कृषी विद्यापिठांचा हा (अप)प्रचार, म्हणजे ‘खत-सम्राटां’च्या जागतिक अर्थकारणाचा एक भाग तर नसेल ना ?’, अशी कुणी शंका घेतल्यास आश्चर्य वाटू नये.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.(२१.८.२०२२)