‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणी ९ जण कह्यात !
समाजाची नीतीमत्ता किती खालच्या स्तराला गेली आहे, याचे उदाहरण !
पुणे – महिलेला ‘लोन ॲप’ डाऊनलोड करायला सांगून मागणी केली नसतांनाही कर्ज संमत करून त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी धमकावून १ लाख ११ सहस्र रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी बेंगळुरू येथून ९ जणांना कह्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात खंडणी, फसवणूक, अब्रूनुकसानी, धमकावणे इत्यादी कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने तक्रार प्रविष्ट केली होती. १४ फेब्रुवारी ते १० जून या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ही घटना घडली. आरोपींनी महिलेच्या भ्रमणभाषमधील संपर्क क्रमांक, छायाचित्रे आणि माहिती चोरून अपकीर्तीकारक संदेश संपर्क यादीतील लोकांना पाठवणार, असे सांगून महिलेला धमकावले. आरोपींकडे अनेक जणांची माहिती सापडली आहे. या आरोपींना माहिती पुरवणारे आणि तांत्रिक साहाय्य करणारे इत्यादींच्या माहितीसह खंडणीची रक्कम आरोपींकडून पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी साहाय्यक सरकारी अधिवक्ता विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात केली असून त्यांची मागणी मान्य झाली आहे.