गोंगाटात आराधना करणे शक्य नसल्याने गरब्यासाठी आधुनिक ध्वनीयंत्रणेची आवश्यकता नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचे न्यायालयाचे निर्देश !
मुंबई – नवरात्रीच्या काळात आदिशक्तीची पूजा केली जाते. त्यासाठी ध्यान करावे लागते. गोंगाटात ध्यान लावणे शक्य नसते. दांडिया आणि गरबा हे धार्मिक उत्सवाचा अंगभूत भाग आहेत. त्यामुळे ते पूर्णपणे पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने सादर केले जाऊ शकतात. त्यासाठी ‘डीजे’, ध्वनीक्षेपक यांसारख्या अत्याधुनिक ध्वनीयंत्रणेची आवश्यकता नाही, असे वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने केले.
शांतताक्षेत्रात दांडिया, गरबा खेळला जात असल्याने त्या ठिकाणी ‘ध्वनीयंत्रणे’चा वापर करण्यास मनाई करावी, यासाठी न्यायालयात प्रविष्ट झालेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरता येऊ शकत नाही; परंतु याचा अर्थ सण साजरा केला जाऊ शकत नाही, असे नाही, असे नमूद करत न्यायालयाने या याचिकेवर धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले.
१. उपासना करतांना अन्यांसाठी त्रासदायक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी देवीची पूजा अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. उत्सवाची शिस्त मोडणार नाही आणि पावित्र्य भंग होणार नाही, याची भक्तांनी काळजी घ्यावी.
२. गरबा आणि दांडिया हा हिंदु धर्मातील एका मोठ्या वर्गाचा भक्ती व्यक्त करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे गरबा आणि दांडिया हे पारंपरिक पद्धतीने साजरा करा. नवरात्रोत्सवात देवीच्या भक्तांच्या पूजेत व्यत्यय येत असेल, तर पूजा होऊ शकत नाही.
३. नवरात्रोत्सवात देवीच्या शक्तीरूपाची पूजा केली जाते. ही उपासना एकाग्रतेने होणे महत्त्वाचे आहे. गोंगाट असेल, तर मन एकाग्र ठेवून पूजा करता येईल का ?
४. खरा भक्त देवीची भक्ती आणि पूजा विचलित न होता आणि अन्यांना त्रास न देता करू इच्छितो. त्यामुळे साहजिकच अन्यांनीही त्याच्या भक्तीमध्ये व्यत्यय न आणता तो भक्ती करू इच्छितो.
संपादकीय भूमिका
|