मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोव्यात आणले जाणारे ‘ब्लॅक कोकेन’ जप्त
पणजी, २९ सप्टेंबर (वार्ता.) – अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एन्.सी.बी.) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलिव्हियाच्या एका महिलेकडून १५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलोग्रॅम वजनाचे ‘ब्लॅक कोकेन’ जप्त करण्यात आले. हे अमली पदार्थ गोव्यात आणले जाणार होते, असे अन्वेषणातून आढळून आले आहे. या महिलेला अटक करण्यात आली असून याच व्यवहाराच्या संबंधात एन्.सी.बी. कडून गोव्यातील एका नायजेरियाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही बोलिव्हियाची महिला ब्राझिलहून मुंबईला आली होती. मुंबईहून गोव्याच्या विमानात चढण्याच्या वेळी तिची झडती घेतली असता तिच्याजवळ ब्लॅक कोकेन हा अमली पदार्थ सापडला.
हा अमली पदार्थ एका नायजेरियाच्या महिलेच्या साहाय्याने ग्राहकांपर्यंत पोचवला जाणार होता. एन्.सी.बी.ने केलेल्या कारवाईमुळे हा डाव उधळला गेला. एन्.सी.बी.च्या गोवा शाखेला नायजेरियाच्या महिलेची माहिती दिल्यानंतर या शाखेकडून तिला अटक करण्यात आली. हा १५ कोटी रुपयांचा अमली पदार्थ गोव्यात आल्यावर तो इतर राज्यात वितरीत करण्याची सिद्धता करण्यात आली होती, असे एन्.सी.बी.च्या अन्वेषणात आढळून आले आहे. गोव्यातून भाग्यनगरला अमली पदार्थांचा पुरवठा होतो, असा दावा भाग्यनगर पोलिसांनी यापूर्वी केला होता. या घटनेमुळे त्यांच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.