सांस्कृतिक प्रसाराचे सूर !
भारतात स्मारकांची काही कमी नाही ! गावागावांत, चौकाचौकांत पुतळे असतातच. भारतातील बहुतांश शहरांत एकतरी गांधी चौक आणि तेथे त्यांचा पुतळाही आहे. त्यामुळे सामान्यांना आतापर्यंतच्या काळात या पुतळ्यांविषयी फारसे काही आकर्षण नव्हते. ‘तो एक राजकीय उपक्रम आहे’, असे समजून उलट त्याकडे दुर्लक्षच केले जाई ! गेल्या काही कालावधीपासून मात्र पुतळे आणि स्मारके यांच्या उभारणीत विशेष पालट झाल्याचे दिसून येत आहे. २८.९.२०२२ या दिवशी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्याहून विशेष हे की, या चौकात वीणेची ४० फूट लांबीची आणि १४ टन वजनाची एक सुंदर प्रतिकृती बनवण्यात आली आहे. हे निश्चितच एक सकारात्मक आणि चांगले पाऊल आहे.
एकमेवाद्वितीय स्मारक !
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यामुळे भारतीय संगीत जागतिक पातळीवर पोचले. शासनाला त्यांच्या कार्याची अशा सामाजिक अंगाने नोंद घ्यावीशी वाटली, ते विशेष आहे. त्याहून विशेष हे आहे की, तेथे त्यांच्या दैवी सुरांना अखंड साथ दिलेल्या वीणेची भव्य प्रतिकृती बनवली आहे. ‘राम से बडा रामका नाम’, अशी एक म्हण आहे. येथे लतादीदींचे मोठेपण तर आहेच; परंतु त्यांनी सुरेल गायनाचा जो अभिजात वारसा भारतियांना दिला, तो चिरंतन टिकणारा आहे. त्याचे स्मरण करून देणारी ती सुबक वीणा हे आता अयोध्येचे एक विशेष आकर्षण ठरेल. या वीणेमुळे पुढील अनेक पिढ्यांना देशाच्या या सांगितिक वारशाचे स्मरण होईल. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराची उभारणी चालू आहे. जगभरातील भाविक, भक्त, पर्यटक त्या मंदिरात दर्शनाला येतील, तेव्हा त्या सर्वांपर्यंत भारतीय अभिजात संगीताचा वारसा पोचेल ! आपल्या देशाने महान संगीतकारांचा गौरव वेळोवेळी केलेला आहे. त्यांच्या वाद्यालाही असे उच्च स्थान देणारे हे एकमेवाद्वितीय स्मारक आहे. वीणा हे श्री सरस्वतीदेवीचे वाद्य आहे. ते ईश्वराशी सूर जुळवणारे वाद्य आहे. प्रभु रामचंद्रांच्या जन्मभूमीमध्ये श्री सरस्वतीदेवीचे वाद्य असलेली वीणा आणि सरस्वतीपुत्री असलेल्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या भक्तीरसपूर्ण गीतांचे स्मरण होणे, हे भारतीय शास्त्रीय संगीताला ऊर्जितावस्था प्राप्त होत असल्याचे दर्शवते. आज सर्वत्र पाश्चात्त्य संगीताचे उदात्तीकरण चालू असतांना शासनाने वीणेची ही भव्य प्रतिकृती उभारून योग्य तो संदेश दिला आहे. नवोदित गायक आणि संगीतकार यांना शासनाच्या या कृतीतून निश्चितच प्रेरणा मिळेल ! ही केवळ वीणा नाही, तर त्यावर सरस्वतीदेवी आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या सुंदर कलाकृती आहेत. कलेच्या माध्यमातून भगवंताला आळवण्याची एक सुंदर प्रेरणा त्यातून मिळेल.
स्थानिक परंपरांचे पुनरुज्जीवन व्हावे !
राष्ट्राचा सर्वांगाने विकास व्हावा लागतो. सातत्याने बेरोजगारी, महागाई, दुष्काळ आणि समस्या यांचे रडगाणे गाऊन राष्ट्र पुढे जात नाही. राष्ट्र म्हणजे केवळ त्यात रहाणारे नागरिक आणि त्यांच्या समस्याही नाहीत. त्या भूमीला लाभलेला सांस्कृतिक, वैचारिक, पर्यावरणीय, राजकीय आणि नैसर्गिक समृद्ध वारसा जोमाने पुढे नेणे, हीच राष्ट्र उभारणी आहे. गेल्या काही वर्षांपासून समृद्ध आणि सर्वांगीण राष्ट्र उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत, हे शासनाच्या कृतीतून दिसून येते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्वतंत्र भारतातील व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले; मात्र त्यांच्या कष्टांचा यथोचित सन्मान झाला नाही. गुजरातमध्ये सरदार सरोवर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारल्याने त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचाही परिचय पुढील अनेक पिढ्यांना होणार आहे अन् आता तेथील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली आहे. भाग्यनगर (तेलंगाणा) येथेही भारतात प्रथमच समतेचा संदेश देणारे वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांची ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (समानतेचे प्रतीक असलेला पुतळा) नावाची २१६ फूट उंचीची मूर्ती पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली. रामानुजाचार्य यांनी सामाजिक समता आणि भक्तीचा प्रसार यांसाठी पुष्कळ परिश्रम घेतले. दक्षिण भारतात आजही त्यांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांच्या या भव्य प्रतिकृतीमुळे त्यांच्या शिकवणीला पुन्हा पुन्हा उजाळा मिळेल ! एकप्रकारे ‘त्या त्या प्रांतातील युवकांपुढे आदर्शांचे निर्माण या स्मारकांच्या माध्यमातून होत आहे’, असे म्हणायला हवे. आतापर्यंत चौकाचौकांत ज्यांचे पुतळे पाहिले, त्यांच्या आदर्शांचे आचरण केल्याने किती दुष्परिणाम झाले, ते प्रत्येक जण भोगत आहे. आता ज्या स्थानिक व्यक्तीमत्त्वांना सार्वजनिक ठिकाणी भव्य रूपाने सादर केले जात आहे, ते अनुसरण्यासारखे आहे.
मध्यंतरी मध्यप्रदेशमधील अभयारण्यासाठी नामिबिया या देशातून चित्ते आणण्यात आले. राष्ट्राच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी प्रयत्न होत आहेत, असे यातून नक्कीच म्हणता येते. याही पुढे जाऊन शासनाने संस्कृतीचा प्रसार अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय शिक्षणप्रणालीला प्रोत्साहन द्यावे. भारतातील १४ विद्या आणि ६४ कला यांचे सखोल शिक्षण देणार्या विद्यापिठांच्या उभारणीसाठी योगदान द्यावे, जेणेकरून हा सर्व सांस्कृतिक वारसा चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येईल. लता मंगेशकर चौकातील वीणेचे लोकार्पण करतांना पंतप्रधान मोदी यांनी ‘अयोध्येचा आध्यात्मिक स्तरावर विकास केला जाईल’, असे म्हटले आहे. त्या त्या क्षेत्रांतील स्थानिक परंपरा लक्षात घेऊन त्यांच्या प्रसाराचा उद्देश ठेवून विकास केला, तर जनताही अशा उपक्रमांना भरभरून पाठिंबा देते.
एकीकडे उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !
सरकारने भारतीय संस्कृतीचा प्रसार अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय शिक्षणप्रणालीला प्रोत्साहन द्यावे ! |