नाशिक येथील स्वामीनारायण संप्रदायामुळे भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना वैश्विक आयाम लाभला! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नाशिक – बी.एस्.पी.एस्. स्वामीनारायण संप्रदाय हा १५० हून अधिक सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना या संप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला आहे. शहरातील तपोवन भागात साकारण्यात आलेले स्वामीनारायण मंदिर भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचे जतन आणि नाशिक शहराची शोभा वाढवणारे ठरेल. मी मुख्यमंत्री झालो आहे, ही स्वामीनारायणांचीच कृपा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ सप्टेंबर या दिवशी येथे केले.
येथील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बी.ए.पी.एस्.) मंदिराच्या वेदोक्त मूर्तीप्रतिष्ठाविधी समारंभात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर स्वामीनारायण संस्थेचे प्रेरम् प.पू. महंत स्वामी महाराज, सद्गुरु संत कोठारी बाबा (भक्तीप्रियदास), श्री विवेक सागर महाराज, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, सुहास कांदे उपस्थित होते. सोहळ्यात बी.ए.पी.एस्. स्वामीनारायण संस्थेच्या वतीने स्वामी निलकंठवर्णी महाराज यांची धातू प्रतिमा आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्र्याचा सन्मान करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंदिराची पहाणी करून दर्शन घेतले.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदावरीच्या तिरावर साकारलेले हे स्वामीनारायण मंदिर नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. अशा आध्यात्मिक वास्तू, सेवा आणि त्याग यांच्या विचारांतून समाजाला जोडण्याचे काम स्वामीनारायण संप्रदायाच्या माध्यमातून जगभर केले जात आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प.पू. महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून महाआरती करण्यात आली. वेदमंत्र आणि पुरोहित यांच्या हस्ते संकल्प करून ‘हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे’, असे घोषित करण्यात आले.
देशात सुख-शांती कायम असेल, तर विकास साधला जाईल ! – प.पू. महंत स्वामी महाराज
देशात सुख-शांती कायम असेल, तरच विकास साधला जाईल आणि देश पुढे जाईल. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत !