देशात संस्कृत बोलणार्यांची संख्या केवळ २४ सहस्र ८२१ !
नवी देहली – भारतात संस्कृत बोलणार्यांची संख्या केवळ २४ सहस्र ८२१ इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या जनगणना आयुक्त कार्यालयाच्या भाषा विभागाने दिली. आगरा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. देबाशिष भट्टाचार्य यांनी यासंदर्भात माहिती अधिकाराच्या अंतर्गत याविषयीची माहिती मागितली होती. ‘पंजाब, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उर्दू भाषा बोलली आणि लोकांना समजते’, अशीही माहिती याद्वारे मिळाली आहे.
१. डॉ. भट्टाचार्य यांनी सांगितले की, ‘वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार केवळ ०.००२ टक्केच लोक संस्कृत बोलतात’, असे समोर आले आहे. संस्कृत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. संस्कृतला राज्यघटनेत अल्पसंख्यांकांची भाषा म्हणून सूचीबद्ध केलेले नाही.
२. वर्ष २०१० मध्ये उत्तराखंड राज्याने संस्कृतला ‘राज्याची दुसरी अधिकृत भाषा’ घोषित केले होते. असा निर्णय घेणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य आहे.
३. ‘केंद्रीय हिंदी संस्थे’कडून संस्कृतसमवेतच ब्रज, अवधी, भोजपुरीसह अन्य १८ भाषांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती या संस्थेच्या भाषातज्ञ डॉ. सपना यांनी दिली. यासाठी ३ शब्दकोश सिद्ध करण्यात आले असून १५ शब्दकोशांवर काम चालू आहे, असेही डॉ. सपना यांनी सांगितले.
४. उत्तरप्रदेशच्या हमीरपूरच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांनी ९ सप्टेंबर २०२२ या दिवशी एका प्रकरणाचा संस्कृत भाषेत निकाल दिला होता. न्यायाधिशांच्या या कृतीनंतर संस्कृत भाषा पुन्हा चर्चेत आली होती. डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांनी संस्कृतमध्ये पी.एच्डी. केली आहे. लोप पावत चाललेली संस्कृत भाषा दैनंदिन व्यवहारात आणण्यासाठी त्रिपाठी प्रयत्न करत आहेत.
संपादकीय भूमिका
|