आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी रहित करावी ! – बिरसा फायटर्सची राज्यपालांकडे मागणी !
आमदार लताबाई सोनवणे यांचे अवैध जात प्रमाणपत्र प्रकरण
संभाजीनगर – ‘अवैध जात प्रमाणपत्रावरून शिंदे गटाच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी रहित करावी’, अशी मागणी बिरसा फायटर्स (‘द ट्रायबल ऑर्गनायझेशन’चे) अध्यक्ष सुशीलकुमार पावरा आणि संघटनेच्या राज्यभरातील एकूण ५२२ पदाधिकार्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे २७ सप्टेंबर या दिवशी केली आहे.
लताबाई सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. सध्या त्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. राज्यपाल निवडणूक आयोगाचे मत विचारात घेऊन काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे. ‘सोनवणे यांची आमदारकी अपात्र ठरवावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यपालांकडे केली आहे.
काय आहे प्रकरण ?आमदार सोनवणे यांनी वर्ष २०१९ ची सार्वत्रिक निवडणकू लढवतांना खोटे जात वैधता प्रमाणपत्र प्रविष्ट केले होते. आमदार सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार जिल्हा यांनी ९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी अवैध ठरवले होते. त्या अनुषंगाने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून समितीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या वेळी खंडपिठाने १० जून २०२२ या दिवशी ही याचिका फेटाळून लावत ‘प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय योग्य आहे’, असा निर्वाळा दिला होता. |