नवीन आष्टी-नगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आष्टी-नगर ६६ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ
बीड – नवीन आष्टी ते नगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सर्वच प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात येणार असून शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्यावर सध्याचे सरकार भर देणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
नगर-बीड-परळी वैजनाथ या २६१ किलोमीटर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नवीन आष्टी-नगर ६६ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन आणि डेमू सेवेचा प्रारंभ अशा दुहेरी कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृष्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महसूल, पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील; रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.