स्थुलातून स्वतःतील देवत्वाची प्रचीती देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने…
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा २५.९.२०२२ या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने साधकांना त्यांची जाणवलेली दैवी वैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी केलेले काव्य येथे देत आहोत.
१. साधिका भावप्रयोग करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ तिच्या समोर देवीच्या रूपात प्रकट होणे आणि तिला देवीची वात्सल्यमय आवाजात ‘अश्विनी’ अशी हाक ऐकू येऊन तिची भावजागृती होणे
‘एकदा मी सेवेच्या ठिकाणी बसून भावप्रयोग करत होते. त्या वेळी मी सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कक्षात गेले आणि त्यांच्या चरणांशी हात जोडून बसले. त्या क्षणी माझ्या समोर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ लाल साडी नेसलेल्या, डोक्यावर मुकुट आणि देहावर अलंकार धारण केलेल्या अन् डाव्या हातात त्रिशूळ घेतलेल्या अशा सुंदर देवीच्या रूपात प्रकट झाल्या. देवीने तिचा उजवा हात माझ्या मस्तकावर ठेवला आणि अत्यंत वात्सल्यमय आवाजात मला ‘अश्विनी’, अशी हाक मारली. देवीचा स्पर्श जाणवून आणि तिचा आवाज ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव फारशी नव्हती. मी अनुमाने ३ – ४ मिनिटे त्या भावस्थितीतच होते. माझे मन कृतज्ञताभावाने भरून आले. मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
२. भावप्रयोग केल्यानंतर ५ मिनिटांतच दूरभाषवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वात्सल्यमय आवाजात ‘अश्विनी’ असे संबोधणे
त्यानंतर मी त्या भावस्थितीतच सेवा करू लागले. नंतर ५ मिनिटांतच मी सेवा करत असलेल्या ठिकाणी दूरभाष आला. मी ‘नमस्कार’ असे म्हणताच भावप्रयोगाच्या वेळी मला ऐकू आली होती, तशीच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वात्सल्यमय आवाजात ‘अश्विनी’ अशी हाक मारली. (एरव्ही त्या मला ‘अश्विनीताई’ असे संबोधतात.) त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला आणि माझा भाव जागृत झाला.
३. या प्रसंगातून मला भगवतीरूपे दर्शन देणारी देवी, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ असल्याची प्रचीतीच त्यांनी मला स्थुलातून दिली.
हे वात्सल्यमयी भगवती, मी तव चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०२१)
|