(म्हणे), ‘पुरावे असतील तर चौकशी करा; पण विनाकारण त्रास देऊ नका !’ – इम्तियाज जलील, खासदार
संभाजीनगर – ‘देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.) विरुद्ध कारवाईचे सत्र चालूच आहे. ए.टी.एस्. त्यांचे काम करत आहे. पुरावे असतील, तर चौकशी करा; पण विनाकारण त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया ‘एम्.आय.एम्’चे खासदार इम्तियाज जलील यांनी २७ सप्टेंबर या दिवशी येथे दिली. राज्यभरात आतंकवाद विरोधी पथक (ए.टी.एस्.) आणि स्थानिक पोलीस यांनी ‘पी.एफ्.आय.’च्या ४३, तर देशातील २४७ हून अधिक जणांना कह्यात घेतले आहे.
जलील म्हणाले की, याआधी अनेकांना संशयावरून कह्यात घेण्यात आले होते. त्यांना १०-१० वर्षे न्यायालयात रहावे लागले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केलेली आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत; म्हणून जर ए.टी.एस्. किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणांकडे पुरावे असतील, तर त्यांनी कारवाई करावी. पी.एफ्.आय.सारख्या संघटनांचे कुणीही समर्थन करणार नाही. ‘ए.टी.एस्.’ने ज्यांना कह्यात घेतले त्यांचे कुटुंबीय माझ्याकडे येत असून ते सांगत आहेत की, त्यांच्या मुलांनी काहीही केले नाही. तरीही त्यांना कह्यात घेण्यात आले. ए.टी.एस्. किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणांकडे काय पुरावे आहेत ? हे कुणीही सांगू शकत नाही. त्यांना आणखी काही अन्वेषण करायचे असेल, तर त्यांनी नक्की करावे.
संपादकीय भूमिकापुराव्यांची भाषा करण्याऐवजी जलील यांनी मुसलमान तरुणांना आतंकवादी कारवाया करण्यापासून रोखावे ! |