आद्याशक्ती
नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…
कोणत्याही देवतेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर तिच्याविषयी श्रद्धा वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २७ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तीची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
१. अर्थ : ‘महाकाली हे ‘काल’तत्त्वाचे, महासरस्वती हे ‘गती’ तत्त्वाचे आणि महालक्ष्मी हे ‘दिक्’ (दिशा) तत्त्वाचे प्रतीक आहे. कालाच्या उदरात सर्व पदार्थमात्रांचा विनाश होतो. जिथे गती नाही, तेथे निर्मितीची प्रक्रियाच खुंटते. तरीही अष्टदिशांतर्गत जगताच्या निर्मितीसाठी, पालनपोषणासाठी आणि संवर्धनासाठी एक प्रकारची शक्ती सदैव कार्यरत रहाते. हीच आद्याशक्ती होय. वरील तिन्ही तत्त्वे या महाशक्तीत अनुस्यूत (अखंडपणे) असतात.’
‘महाकाली तामसी आहे. त्यामुळे तिच्या चित्रात ते तत्त्व खेचले जाते. महाकालीचे वर्णन ‘स्मशानात वास्तव्य करणारी’, असे आहे. त्यामुळे शेजारी स्मशान असल्यास तेथील शक्तीही तिच्या चित्रात खेचली जाते. शक्यतो घरात दशभुजा रूप असलेले चित्र ठेवत नाहीत. चतुर्भुजा असलेल्या रूपातील देवीचे चित्र ठेवतात.’
– १०८ महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरी (खंडेश्वरी महाराज)
२. काही इतर नावे : आदिशक्ती, पराशक्ती, महामाया, काली, त्रिपुरसुंदरी आणि त्रिपुरा. यांतील काही शक्तींची विशिष्ट माहिती पुढे दिली आहे.
२ अ. काली : ‘महानिर्वाणतंत्रात दिल्याप्रमाणे काली (आद्याशक्ती) वस्तूतः अरूप आहे; पण गुण आणि क्रिया यांना अनुसरून तिची रूपकल्पना केली जाते. ती जेव्हा सृष्टीकर्मात निमग्न असते, तेव्हा ती रजोगुणी अन् रक्तवर्णी होते; विश्वस्थितीच्या उद्योगात असते, तेव्हा सत्त्वगुणी आणि गौर अन् संहारक्रियेत मग्न असते, तेव्हा तमोगुणी आणि काळी असते.’
२ आ. त्रिपुरा : ‘त्रिपुरा शब्दाची व्याख्या अशी –
त्रीन् धर्मार्थकामान् पुरति पुरतो ददातीति । – शब्दकल्पद्रुम
अर्थ : धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांना जी साध्य करून देते, ती त्रिपुरा होय.
त्रिपुरेची अनेक रूपे असून प्राचीन काळी या सर्वांची उपासना होत असे. त्रिपुरा प्रथम कुमारी म्हणून अवतीर्ण झाली आणि नंतर तिने स्वतःची त्रिपुराबाला, त्रिपुरभैरवी अन् त्रिपुरासुंदरी / त्रिपुरसुंदरी अशा तीन रूपांत विभागणी केली.’
२ इ. त्रिपुरसुंदरी : ‘त्रिपुरसुंदरीला शाक्तांनी ‘पराशक्ती’ असे म्हटले आहे. उपासक त्रिपुरसुंदरीची उपासना चंद्ररूपाने करतात. चंद्राच्या सोळा कला आहेत. एक ते पंधरापर्यंतच्या कलांचा उदय आणि अस्त होत असतो; परंतु षोडशी कला मात्र नित्य असते. तिला ‘नित्यषोडशिका’ म्हटले आहे. ही षोडशी म्हणजेच सौंदर्य आणि आनंद यांचे परमधाम अशी ‘महात्रिपुरसुंदरी’ होय.’
२ ई. तीन मुख्य रूपे : आद्याशक्तीने कार्यानुमेय धारण केलेली रूपे आणि त्यांची वैशिष्ट्ये यांची माहिती पुढील सारणीत दिली आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’)