करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ !
कोल्हापूर, २६ सप्टेंबर (वार्ता.) – करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रारंभी तोफेची सलामी देऊन मंदिरात घटस्थापना करण्यात आली. २ वर्षांनंतर निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
पहिल्या दिवशी सिंहासनाधिश्वरी रूपातील श्री महालक्ष्मीदेवीची पूजा !
नवरात्र म्हणजे केवळ देवीचा आनंद उत्सव नसतो, तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे एक महत्त्वाचे पर्व होय. या अनुष्ठानाची पहिली पात्रता म्हणजे स्थिरता होय. ही स्थिरता येण्यासाठी आसनस्थ असणे आवश्यक आहे. साधारणपणे माणसाच्या नावाआधी श्री. हे उपपद लागते; परंतु देवीच्या सिंहासनाच्या नावाआधी श्री उपाधी लावली जाते, याचे कारण ती ज्या आसनावर विराजमान आहे ते आसनच मुळात सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे कर्ते असणार्या त्रिदेवांच्या आधाराने सिद्ध होते. त्यामुळे जगदाद्य शक्ती अशी करवीरनिवासिनी ही पहिल्या दिवसाच्या पूजेमध्ये सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे, अशा स्वरूपाची सिंहासनाधिश्वरी या रूपात पूजा साकारण्यात आली आहे.