आयुर्वेदातील रसायन चिकित्सेद्वारे कर्करोगावर मात
पुणे येथील वैद्य योगेश बेंडाळे यांचा शोधनिबंध
पुणे – आयुर्वेदाला पर्यायी उपचारपद्धती मानले जाते. कर्करोगासारख्या असाध्य आजारांवर आयुर्वेदातील वनौषधी प्रभावी ठरू शकतात, असा विश्वास पुण्यातील ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’मधील वैद्य योगेश बेंडाळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी ‘डिफ्युज लार्ज बी सेल लिम्फोमा’ (डी.एल्.बी.सी.एल्.) या गंभीर स्वरूपाच्या कर्करोगावर आयुर्वेदाद्वारे उपचार करून ५१ वर्षीय महिलेला ‘कर्करोगमुक्त’ केले आहे. त्याविषयीचे सर्व अहवाल इंग्लंडमधील ‘क्लिनिकल केस रिपोर्ट्स’ या मानांकित वैद्यकीय नियतकालिकामध्ये शोधनिबंधाद्वारे मांडण्यात आले आहेत.
वैद्य बेंडाळे म्हणाले, ‘‘आयुर्वेद शास्त्रातील रसायन चिकित्सेच्या माध्यमातून संभाव्य रोगांवर उपचार करता येतो. ही चिकित्सापद्धत ‘औषधकेंद्रीत’ नसून ती ‘रुग्णकेंद्रीत’ आहे. त्यामुळे रुग्णाच्या प्रत्येक पेशीवर या औषधांचा चांगला परिणाम झाला. यात रोगप्रतिकारक शक्तीच्या संतुलनावर विशेष लक्ष दिले जाते. शरिरातील पेशी त्यांचे नियमित कार्य सुरळीत करू शकतील, यासाठी रसायन कल्पची निवड महत्त्वाची ठरते. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणित निकषांच्या आधारावर केलेल्या विश्लेषणातून आयुर्वेदातील रसायन औषधे घेतल्यानंतरही रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा चांगला राहिला असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.’’