सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीसाठी तळमळत असतांना साधकाला सुचलेले काव्यपुष्प !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या भेटीची ओढ लागून काव्यपंक्ती सुचणे; परंतु ‘सगुणात अडकायचे नाही’, या विचाराने ती कविता स्वतःजवळच ठेवणे
‘एकदा सकाळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची पुष्कळ आठवण येत होती. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची मला ओढ लागली होती. प्रतिदिन मी त्यांना भेटण्यासाठी तळमळत होतो. त्यासाठी मी त्यांच्या छायाचित्रासमोर उभा राहून प्रार्थना करत होतो. त्यामुळे त्यांना भेटण्याची तळमळ पुष्कळ वाढली. मी त्यांना प्रार्थना करत असतांना मला पुढील काव्यपंक्ती सुचल्या. त्या वेळी ‘सगुणात अडकायचे नाही’, या विचाराने मी ती कविता सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना वाचण्यासाठी दिली नाही.
२. चुकांविषयीच्या सत्संगात चुका सांगितल्यावर ‘पुढे जायचे आहे’, या विचाराने त्या चुका स्वीकारून लगेच फलकावर लिहिणे आणि त्याच वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा सत्संग मिळणार असल्याचा निरोप मिळाल्याने भाव जागृत होणे
दुसर्या आठवड्यात एका सत्संगात माझ्या चुका सांगण्यात आल्या. सत्संग संपताच माझ्या मनात विचार आला, ‘चुका स्वीकारून प्रयत्न केले, तर मला पुढच्या टप्प्याला जाता येईल.’ त्यामुळे मी लगेच त्या चुका आश्रमातील चुका लिहिण्याच्या फलकावर लिहिल्या. त्याच वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा सत्संग मिळणार असल्याचा निरोप मिळाला. तेव्हा माझा भाव जागृत झाला. तेव्हापासून पुढे ३६ घंटे मी भावावस्था अनुभवत होतो.
गुरुदेवांच्या भेटीसाठी आतुर झाल्यामुळे लिहिलेली कविता गुरुचरणी अर्पण करत आहे.’
धाव धाव रे दयाघना स्थिर करी चित्त तव चरणा ।
ओढ घेई चित्त माझे तव चरणांठायी ।
व्याकुळ होई मन माझे तव दर्शनासाठी ।। १ ।।
तळमळे जीव मम तव कृपादृष्टी पडण्या ।
बापुडा मी होई अधीर चरण तव पहाण्या ।। २ ।।
जरी तुम्ही आहात नित्य समवेत माझ्या ।
सगुण दर्शनाची ओढ लागे मज मना ।। ३ ।।
स्थुलाहूनी सूक्ष्म श्रेष्ठ ही शिकवण तुमची ।
परि न कळे बुद्धीस माझ्या का लागे ओढ तुमची ।। ४ ।।
संतमेळा रामनाथीचा करी नित्य कृपा ।
परि जीव हा तळमळे पहाण्या तव रूपा ।। ५ ।।
चोखामेळ्याची भक्ती ओढून नेई तुम्हा ।
आठवता ते परमभाग्य, नसे भक्ती तैसी आमुची ।। ६ ।।
धाव धाव रे दयाघना स्थिर करी चित्त तव चरणा ।
अश्रूंसही देण्या वाट देई दर्शन आता ।। ७ ।।
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |