मेट्रोच्या कामामुळे विलेपार्ले येथे ८ घरे कोसळली, ४० पेक्षा अधिक घरांना तडे
मुंबई – मेट्रोच्या कामामुळे विलेपार्ले येथे ८ घरे कोसळली असून ४० पेक्षा अधिक घरांना तडे गेले आहेत. विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात २५ सप्टेंबरच्या रात्री ८.३० वाजता ही घटना घडली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. सुदैवाने घरे कोसळण्यापूर्वी ती रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. विलेपार्ले पश्चिमेकडे जुहू रोड इंदिरानगर परिसराजवळ ३० दुमजली झोपड्या आहेत. याच झोपड्यांजवळ मेट्रोचे काम चालू आहे. मेट्रोच्या कामाच्या हदर्यांमुळेच झोपड्या कोसळल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या प्रकरणी महापालिकेकडून अन्वेषण करण्यात येणार आहे.