शक्तीची निर्मिती, विविध नावे आणि देवीच्या उपासनेची वैशिष्ट्ये
सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…
कोणत्याही देवतेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर तिच्याविषयी श्रद्धा वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत.
१. ‘शक्ति’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ
१ अ. पदार्थाचा विशिष्ट धर्म : ‘शक् (समर्थ होणे असणे)’, या धातूला ‘क्तिन्’ प्रत्यय लागून ‘शक्ति’ हे नाम बनले आहे. सामर्थ्य, पराक्रम आणि प्राण हे शक्ती शब्दाचे प्रमुख अर्थ आहेत. प्रत्येक पदार्थामध्ये कार्योत्पादनाला उपयोगी आणि कधीही त्या पदार्थापासून वेगळा न रहाणारा असा जो विशिष्ट धर्म असतो, त्याला ‘शक्ती’ असे म्हणतात, उदा. अग्नी हा शक्तीमान आणि दाहकता ही त्याची शक्ती होय. दाहकता अग्नीपासून कधीच वेगळी रहात नाही. प्रत्येक पदार्थात त्याची अभिन्न अशी एक शक्ती असते. पदार्थ अनंत आहेत आणि त्यामुळे शक्तीही अनंत आहेत.
१ अ १. शक्तीच्या उगमाचे आणि प्रवाहाचे स्वरूप : शिवाची प्रामुख्याने दोन रूपे सांगता येतील. शिवाचे पहिले रूप म्हणजे सर्वव्यापी, पवित्र, ज्ञानमयी, आनंदमयी, चैतन्यस्वरूप असे अविकारी, म्हणजे सदैव स्थिर असणारे परब्रह्म. शिवाचे दुसरे रूप म्हणजे सदैव क्रियाशील असणारे शक्तीतत्त्व. सृष्टीतील सर्व सजीव-निर्जीव गोष्टींच्या रूपातून हे तत्त्व प्रकट होत असते. शक्तीचा उगम स्पंदनांच्या रूपात असतो. शक्ती ही शिवापेक्षा भिन्न नाही, तर ती शिवाचेच अंग आहे. अचेतन शिवाला कार्यान्वित करण्याचे कार्य शक्ती करत असते. उत्पत्ती-स्थिती-लय हा शक्तीचा गुणधर्म आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्यानंतर पुन्हा उत्पत्ती, स्थिती आणि लय, असे चक्र सारखे चालूच असते.
१ आ. शक्तीचे दैवतीकरण : प्रत्येक देवामध्ये असलेल्या शक्तीला दैवताचे रूप दिले जाऊन, त्या शक्तीरूपाला देवी म्हणू लागले. शाक्त संप्रदायी लोकांनी (शाक्त संप्रदाय म्हणजे शक्तीची उपासना करणारा संप्रदाय) तिचा आदिमाया, जगदंबा (सर्व जगाची माता) या नावांनी आदर केला. सर्वसामान्य लोकही शक्तीला ‘आई’ या रूपातच पहातात. ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश आदी देवांसह सर्व देवांशी जगदंबेचा संबंध पोचतो.
१ इ. स्त्रीदेवता
१ ई. देवपत्नी : उदा. विष्णुपत्नी श्री लक्ष्मी
२. शक्तींची नावे, सामर्थ्य आणि गुण यांचा गोंधळ
२ अ. प्रत्येक देवीचा भक्त ‘आमचीच देवी सर्वश्रेष्ठ आहे. तिच्यापासून सर्व देवी निर्माण झाल्या’, असे म्हणतो, उदा.
१. त्रिपुरसुंदरीदेवीत श्री सरस्वती, श्री लक्ष्मी आणि कालीमाता यांचा संगम असल्याने ती सर्वश्रेष्ठ आहे.
२. श्री दुर्गासप्तशतीनुसार महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही दुर्गेची प्रमुख रूपे आहेत.
२ आ. श्री लक्ष्मी हे नाव श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही प्रकारच्या देवींचे आहे.
२ इ. ‘महिषासुरमर्दिनी ही देवी ब्रह्मा-विष्णु-महेश यांच्या संघटित शक्तीतून निर्माण झाली’, असे मत्स्यपुराणात म्हटले असून ‘ती सर्व देवांच्या अंशांपासून उत्पन्न झाली’, असे मार्कंडेयपुराणात सांगितले आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’)