सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्या रंगाचा पट्टा येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
१. कु. मधुरा भोसले
‘सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी यांची आंतरिक साधना चांगल्या प्रकारे चालू असल्यामुळे त्यांचे भगवंताशी अखंड अनुसंधान असते. त्यामुळे त्या शिवात्मादशा अनुभवतात. या अवस्थेमध्ये त्यांच्याकडे ईश्वराचे निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्याचा प्रवाह सतत आकृष्ट होत असतो. या अवस्थेमध्ये त्यांच्या नाभीस्थित आत्म्यातून सतत दैवी प्रकाशाचा झोत त्यांच्या आज्ञाचक्रातून बाहेर पडत असतो. या प्रकाशझोताचा प्रवाह त्यांच्या आज्ञाचक्रातून बाहेर पडत असतांना त्यांचा चेहरा, नाक आणि आज्ञाचक्र येथे पांढर्या रंगाचा पट्टा स्थुलातून दिसतो. दैवी चैतन्याची खूण देहावर निर्माण होण्यासाठी स्थूल देह ७० टक्क्यांपेक्षा शुद्ध असणे आवश्यक असते. सद्गुरु (श्रीमती) कुवेलकर आजी यांचा स्थूलदेह ८० टक्के शुद्ध असल्यामुळे त्यांच्या देहाच्या माध्यमातून समष्टीच्या कल्याणासाठी प्रक्षेपित झालेली ईश्वरी चैतन्याची खूण त्यांच्या देहावर स्थुलातून उमटलेली आहे. त्यामुळे १९.६.२०२२ या दिवसापासून सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि चेहरा यांवर पांढर्या रंगाचा पट्टा आला आहे.’
१ अ. सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी यांची वाटचाल परात्पर गुरुपदाकडे चालू असणे
सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी यांची आंतरिक साधना चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची वाटचाल परात्पर गुरुपदाकडे वेगाने चालू आहे. सद्गुरु आजींच्या देहावर उमटलेल्या वरील दैवी चिन्हातून त्यांच्या देहातील सगुणतत्त्व संपुष्टात येऊन त्यांची वाटचाल ईश्वराच्या निर्गुणतत्त्वाकडे वेगाने चालू असल्याचा शुभसंकेत मिळतो.
१ आ. सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी ईश्वराशी एकरूप झाल्याचे प्रतीक असणे
सर्व संत हे भगवंताचे अनन्य भक्त असतात. संतांच्या पातळीनुसार त्यांना भगवंताच्या प्रथम सगुण रूपाशी आणि त्यानंतर निर्गुण रूपाशी एकरूप होता येते. संतांच्या पातळीनुसार ते भगवंताशी किती प्रमाणात एकरूप होतात, हे आपल्याला पुढील कोष्टकावरून लक्षात येते. मोक्षप्राप्त केल्यावर ईश्वराच्या निर्गुणतत्त्वाशी एकरूपता अनुभवण्यास मिळते.
१ आ १. संतांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांचे ईश्वराशी होणार्या एकरूपतेचे प्रमाण (टक्के) आणि संतांना प्राप्त होणार्या मुक्तीचे स्वरूप
टीप – साधकाने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यावर त्याला महर्लाेकात किंवा देवतांच्या सगुण लोकात सूक्ष्मातून स्थान मिळते. त्यामुळे त्याला ‘सलोक मुक्तीची’ प्राप्ती होते.
१ आ २ . सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी यांची वाटचाल मोक्षपदाकडे चालू असणे : वरील सारणीतून हे लक्षात येते की, सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी यांना सायुज्य मुक्ती मिळाली असून त्यांची वाटचाल ‘मोक्षपदाकडे’, म्हणजे निर्गुणस्वरूपी ईश्वराशी १०० टक्के एकरूप होण्याच्या उच्चतम अवस्थेकडे चालू आहे. यावरून त्यांच्या भक्तीची महानता, त्यांच्या साधनेची श्रेष्ठता आणि त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील उच्चतम अधिकार आपल्या लक्षात येतो.
कृतज्ञता
‘दैवी चैतन्याची खूण स्थुलातून कशी दिसते ?’ याची अनुभूती मला सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि चेहरा यांवर पांढर्या रंगाच्या पट्ट्यातून अनुभवण्यास मिळाली. यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०२२)
२. श्री. राम होनप
२ अ. साधकाच्या आध्यात्मिक वाटचालीचे विश्लेषण
२ अ १. साधकाच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवास आणि साधनेनुसार तिचे पालटत जाणारे स्वरूप : ‘साधक साधनेला आरंभ करतो, तेव्हा त्याच्या मूलाधारचक्राच्या ठिकाणी असलेली कुंडलिनीशक्ती जागृत होते. ती ‘शक्ती’स्वरूपात असते. साधकाची साधना वृद्धींगत होते, तेव्हा शक्तीचे रूपांतर चैतन्यात होते. त्यानंतर साधनेनुसार तिचे रूपांतर ‘आनंद’, ‘शांती’ आणि ‘परमशांती’ या स्वरूपांत होते.
२ अ २. कुंडलिनीशक्ती सर्पाच्या आकाराप्रमाणे असण्यामागील कारण : साधकाच्या मूलाधारचक्राच्या ठिकाणी असलेली कुंडलिनी जागृत होते, तेव्हा ती शक्ती मणिपूरचक्र, स्वाधिष्ठानचक्र असा पुढील प्रवास करू लागते. हा प्रवास करतांना तिच्या मार्गात साधकाने पूर्वजन्मांत केलेली चांगली किंवा वाईट कर्मे लागतात. त्यातून शक्ती मार्ग काढत पुढे जात असते. त्यामुळे शक्ती सरळ न जाता सर्पाप्रमाणे उजवी-डावीकडे वळण घेत जावे, त्याप्रमाणे प्रवास करते. विविध कुंडलिनीचक्रांत शक्तीच्या मार्गक्रमण करण्याच्या स्वरूपाला सनातन धर्मात ‘सर्पाची’ उपमा दिली आहे.
२ अ ३. कुंडलिनीशक्तीचा सर्पाच्या आकाराप्रमाणे असलेला आकार टप्प्याटप्याने पालटत जाणे : साधकाची साधनेच्या आरंभी कुंडलिनीशक्ती सर्पाकार असते; परंतु साधकाच्या साधनेनुसार तिचा आकार पालटत जातो. साधकाचा प्रवास शक्तीकडून चैतन्याकडे होतो, तेव्हा सर्पाच्या शरिराला वळण असते, तसे कुंडलिनीचक्रांतील शक्तीचे वळण अल्प होत जाते. त्यानंतर ते आणखी अल्प होत जाते आणि शेवटी शक्तीला असलेला सर्पाचा आकार संपुष्टात येतो, तेव्हा कुंडलिनीचा कुंडलिनीचक्रांमध्ये केवळ ‘अनुबंध’ रहातो.
२ अ ३ अ. कुंडलिनीचा ‘अनुबंध’ म्हणजे काय ? : साधकाच्या साधनेमुळे ईश्वरी ऊर्जेचा प्रवाह मूलाधार ते सहस्रारचक्र येथपर्यंत सिद्ध होतो. हा ईश्वरी ऊर्जेचा प्रवाह सर्पाप्रमाणे वळणदार नसून सरळ असतो, तसेच तो प्रवाह शक्तीऐवजी चैतन्य, आनंद आणि शांती या स्वरूपांत असतो. हा ईश्वरी ऊर्जेचा प्रवाह सप्तचक्रांना जोडणारा असतो. त्यामुळे त्याला ‘अनुबंध’, असे म्हटले आहे.
या स्थितीला साधकाचे पूर्वजन्मांचे सर्व प्रारब्ध संपलेले असते. त्यामुळे साधकाला ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी कुठलाही अडथळा शिल्लक नसतो. त्यामुळे कुंडलिनीचा आकार सर्पाप्रमाणे वळणदार न रहाता त्याचे रूपांतर सरळ ईश्वरी प्रवाहात होते.
२ अ ४. साधकाची अधोगती झाल्यास मूलाधार ते सहस्रार येथपर्यंत निर्माण झालेल्या ईश्वरी प्रवाहाचे रूपांतर परत सर्पाकार कुंडलिनीशक्तीत होणे : उच्च कोटीची साधना करतांना साधकाची काही कारणास्तव अधोगती झाल्यास मुलाधार ते सहस्रार येथपर्यंत सिद्ध झालेला ईश्वरी प्रवाह आज्ञाचक्र आणि त्या खालील कुंडलिनीचक्रापर्यंत येतो आणि त्याचे शेवटी रूपांतर सर्पाकार कुंडलिनीशक्तीत होते. अशा वेळी साधकाला आध्यात्मिक प्रवासाला नव्याने आरंभ करावा लागतो.
२ आ. सद्गुरु श्रीमती कुवेलकरआजी यांच्या आध्यात्मिक वाटचालीचे विश्लेषण
२ आ १. सद्गुरु कुवेलकरआजी यांचे नाक, आज्ञाचक्र आणि कपाळ यांवर पांढरा पट्टा निर्माण होण्यामागील टप्प्याटप्याने घडणारी सूक्ष्म प्रक्रिया
अ. सद्गुरुआजींची साधनेमुळे कुंडलिनीशक्ती आज्ञाचक्राच्या ठिकाणी प्रथम स्थिर झाली. त्यानंतर ‘शक्ती’चे रूपांतर ‘चैतन्य’, ‘आनंद’, ‘शांती’ यांमध्ये झाले. त्या आता ‘परमशांती’कडे वाटचाल करत आहेत.
आ. सद्गुरुआजींची वाटचाल ‘शांती’तून ‘परमशांती’त होतांना त्यांच्या आज्ञाचक्रावर प्रथम ‘सौम्य’ पांढर्या प्रकाशाची निर्मिती झाली. त्यानंतर ‘मध्यम’ प्रकाशाची निर्मिती झाली. ‘सौम्य’ आणि ‘मध्यम’ दैवी प्रकाशाचा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही.
इ. सद्गुरुआजींच्या आज्ञाचक्रातून कालांतराने ‘तीव्र’ स्वरूपात दैवी प्रकाशाची निर्मिती झाली. त्याचा परिणाम त्यांचे नाक, आज्ञाचक्र आणि कपाळ यांवर दैवी पांढरे पट्टे दिसून आले; कारण ‘तीव्र’ स्वरूपाच्या दैवी प्रकाशाचा परिणाम शरिराच्या पेशीपेशींवर होतो.
२ आ २. ‘परमशांती’ प्रकाश स्वरूपात प्रगट होण्यामागील कारण : ‘परमशांती’ ही प्रकाशस्वरूप असते. त्याला ‘आत्मप्रकाश’, असे म्हणतात. ‘सद्गुरुआजींची भक्ती फलद्रूप झाली आहे’, त्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे त्यांच्यातील परमशांतीची अवस्था प्रकाशस्वरूपात त्यांच्या चेहर्यावर पांढरे पट्टे निर्माण होण्याच्या माध्यमातून प्रगट झाली आहे.
२ इ. मुक्तीचे प्रकार आणि प्रधान तत्त्व
२ इ १. चेहर्यावर पांढरे पट्टे निर्माण होणे, हे सद्गुरुआजींची आध्यात्मिक वाटचाल ‘सस्वरूप मुक्ती’तून ‘सायुज्य मुक्ती’कडे होत असल्याचे लक्षण असणे : सद्गुरुआजींचा आध्यात्मिक प्रवास सगुण-निर्गुण यातून निर्गुणाकडे चालू झाला आहे, म्हणजेच त्या ‘सस्वरूप मुक्ती’तून ‘सायुज्य मुक्ती’कडे वाटचाल करत आहेत. ‘सद्गुरु आजींच्या चेहर्यावर पांढरे पट्टे येणे’, हे त्याचेच एक लक्षण मानले आहे.’
३. निषाद देशमुख
३ अ. सद्गुरु कुवेलकरआजी समष्टी संत असून त्यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्यामुळे त्यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्या रंगाचा पट्टा येणे
३ अ १. व्यष्टी संतांच्या शरिरावर श्रद्धाळू, भक्त आणि संत यांच्या भावानुसार काही काळासाठी दैवी चिन्हे उमटणे : ‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आणि चैतन्याचे भांडार ! व्यष्टी साधना करणार्या संतांकडून श्रद्धाळू, भक्त आणि शिष्य यांच्या भावानुसार बिंब-प्रतिबिंब न्यायाप्रमाणे सगुण शक्ती प्रक्षेपित होते. त्यामुळे अनेक संतांची रूपे विविध देवतांप्रमाणे दिसण्याची अनुभूती भक्त आणि शिष्य यांना येते किंवा या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून काही काळासाठी संतांच्या अंगावर विविध प्रकारची दैवी चिन्हे, उदा. त्रिशूळ, सुदर्शनचक्र इत्यादी उमटतात.
३ अ २. समष्टी संतांच्या शरिरावर ईश्वरेच्छेनुसार दैवी चिन्हे उमटणे किंवा विविध रंगांच्या छटा निर्माण होणे : समष्टी संत ईश्वरेच्छेनुसार वागत असतात. त्यामुळे त्यांच्या देहातून २४ घंटे समष्टीसाठी आवश्यक निर्गुण-सगुण किंवा सगुण-निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होत असते. संतांची प्रकृती, साधनामार्ग आणि परिस्थिती यांनुसार त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे स्तर ठरत असतात. ज्या वेळी समष्टीला सगुण-निर्गुण चैतन्याची आवश्यकता असते, त्या वेळी समष्टी संतांच्या देहावर काही काळासाठी विविध प्रकारची दैवी चिन्हे उमटून त्यांतून समष्टीसाठी आवश्यक चैतन्य प्रक्षेपित होते, उदा. १०.६.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात करण्यात आलेल्या त्रिपुरसुंदरी यागात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या भ्रूमध्यावर पणतीप्रमाणे आकृती उमटली होती. याउलट ज्या वेळी समष्टीला निर्गुण-सगुण चैतन्याची आवश्यकता असते, त्या वेळी समष्टी संतांच्या देहातील विविध भागांवर विविध रंगांची छटा निर्माण होऊन त्या दीर्घकाळ टिकून रहातात, उदा. सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांच्या पायांवर गुलाबी रंगाची छटा सतत दिसते.
३ अ ३. सद्गुरु कुवेलकरआजी समष्टी संत असून १९.६.२०२२ पासून त्यांचे तपोलोकातील कार्य चालू झाल्याने, म्हणजे त्यांच्या निर्गुणाकडे होणार्या वाटचालीमुळे त्यांचे आज्ञाचक्र, नाक आणि चेहरा यांवर पांढर्या रंगाचा पट्टा येणे: सद्गुरु कुवेलकरआजी समष्टी संत असून त्यांची आध्यात्मिक पातळी उच्च आहे. समष्टी संतांचे कार्य केवळ भूलोकापर्यंत मर्यादित नसून ते उच्च लोकांमध्येही सूक्ष्मातून कार्य करत असतात. सप्तलोकांच्या (भूलोक, भुवर्लाेक, स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक यांच्या) पलीकडे निर्गुण असते. जसजसे समष्टी संतांचे उच्च लोकांतील कार्य वाढत जाते, तसतसे त्यांच्यातील निर्गुणतत्त्वात वाढ होते. यालाच ‘संतांची निर्गुणाकडे होणारी वाटचाल’, असे म्हणतात. १९.६.२०२२ पासून सद्गुरु कुवेलकरआजी यांचे तपोलोकातील सूक्ष्मातील समष्टी कार्य चालू झाले आहे. त्यामुळे त्यांच्यातील निर्गुणतत्त्वात वाढ झाल्याने त्यांचे आज्ञाचक्र, नाक आणि चेहरा यांवर पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण झाला आहे.
३ आ. सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा या भागांवर पांढर्या रंगाचा पट्टा येण्यामागील शास्त्र
‘समष्टी संतांच्या देहातील ठराविक भागांवर दैवी चिन्हे उमटणे किंवा विशिष्ट रंगाची छटा येणे’, यांमागेही ईश्वराचा सूक्ष्म कार्यकारणभाव दडलेला असतो.
हात किंवा पाय यांवर उमटणारी दैवी चिन्हे विशिष्ट कार्यासाठी बळ देण्याचे, म्हणजे ‘क्रियाशक्ती’शी निगडित कार्याचे प्रतीक असते. याउलट तोंडवळ्यावरील विविध रंगांच्या छटा ‘ज्ञानशक्ती’शी निगडित कार्याचे, तसेच संतांच्या अद्वितीय आणि आगळ्यावेगळ्या स्थितीचे प्रतीक असते.
३ आ १. सद्गुरु आजींचा चित्तलय होणे चालू होऊन त्या अधिकाधिक ईश्वरेच्छेने वागत असल्याने त्यांच्या तोंडवळ्यावर पांढर्या रंगाचा पट्टा येणे : ‘तोंडवळा मनाचा आरसा असतो’, (Face is the mirror of mind) अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. त्यानुसार व्यक्तीचे मन सतत कार्यरत राहिल्यास तिचा तोंडवळा काळसर, निस्तेज आणि दमलेला दिसतो. व्यक्तीचे मन स्थिर झाल्यावर तिचा तोंडवळा काही प्रमाणात उज्ज्वल दिसू लागतो. जिवाने संतपद गाठल्यावर त्याच्या तोंडवळ्यावर तेज कार्यरत होते. असे असले, तरी जिवाचे चित्त कार्यरत रहातेच. त्यामुळे जिवाला ७० टक्क्यांहून अधिक प्रमाणात ईश्वरेच्छा स्वीकारता येत नाही. ज्या वेळी निर्गुण तत्त्वामुळे जिवाचा चित्तलय होणे चालू होते, त्या वेळी ईश्वरेच्छेच्या प्रमाणात वाढ होऊन जीव स्वतः ईश्वरस्वरूप होऊ लागतो. हीच प्रक्रिया सद्गुरु कुवेलकरआजी यांच्या संदर्भात घडत आहे. सध्या त्यांचा चित्तलय होत असून त्यांच्याकडून ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात ईश्वरेच्छेप्रमाणे आचरण केले जात आहे. चित्तलयामुळे त्यांचे मन निर्विचार स्थितीत असून केवळ ईश्वरेच्छेचे विचार त्यांच्या मनात कार्यरत होतात. या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून त्यांच्या तोंडवळ्यावर पांढर्या रंगाचा पट्टा दिसत आहे.
३ आ २. सद्गुरु आजींचा बुद्धीलय झाल्याने त्यांच्या आज्ञाचक्रावर पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण होणे : सद्गुरु आजींचा बुद्धीलय झालेला आहे. बुद्धीलय झाल्यावर जिवाचे कार्य विश्वबुद्धीच्या साहाय्याने होऊ लागते. वर्तमानकाळात सद्गुरु कुवेलकरआजी यांच्यात ईश्वरी प्रज्ञा (जिच्यामुळे ईश्वरेच्छा आणि त्यामागील कार्यकारणभाव लक्षात येतो अन् लौकिक जगताच्या मर्यादांचे पालन करून ईश्वरेच्छेचे आचरण करता येते, ती बुद्धी.) निर्माण होत आहे. या ‘प्रज्ञा बुद्धी’चे प्रतीक म्हणून त्यांच्या आज्ञाचक्रावर पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण झाला आहे.
३ इ. सद्गुरु आजींमधील समर्पणभावामुळे त्यांचा श्वासोच्छ्वासही ईश्वरेच्छेने होत असल्याने त्यांच्या नाकाच्या ठिकाणी पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण होणे
जिवाने परात्पर गुरु पद गाठल्यावर त्याला ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात ईश्वरेच्छेचे पालन करणे शक्य होते. या टप्प्याला जीव त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याने त्याला देहबुद्धी नसते, तसेच त्याच्या मनात सात्त्विक इच्छा किंवा अपेक्षाही निर्माण होत नाहीत. परात्पर गुरु पद गाठण्यापूर्वी जिवाची देहबुद्धी, तसेच त्याच्या मनात सात्त्विक इच्छा किंवा अपेक्षा कार्यरत असतात. यामुळे व्यष्टी साधना करणार्या अधिकांश संतांना निरंतर ईश्वरी अनुसंधानात किंवा निर्विचार स्थितीत रहाणे कठीण होते. याउलट समष्टी साधनेमुळे सद्गुरु आजींनी उच्च समर्पणाची स्थिती गाठली आहे. सद्गुरु आजींमधील समर्पणभावामुळे त्यांच्या श्वासोच्छ्वासातही देहबुद्धी कार्यरत न होता ती प्रक्रियाही ईश्वरेच्छेने घडत आहे. ज्या वेळी भक्त आपले सर्वस्व ईश्वराला समर्पित करतो, त्या वेळी त्याच्या सर्वस्वावर भगवंताचा अधिकार असतो. या प्रक्रियेत संतांमध्ये आकाशतत्त्व कार्यरत होऊन ते देह, मन आणि बुद्धी यांचे संचालन करते. ही प्रक्रिया ‘अवघा रंग एक झाला…’ या पंक्तींतून संतांनी व्यक्त केली आहे. सद्गुरु आजींमधील समर्पणभावामुळे त्यांची देहबुद्धी न्यून होण्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या नाकाच्या ठिकाणी पांढर्या रंगाचा पट्टा निर्माण झाला आहे.
३ उ. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हा साधकांना सतत सांगत असतात, ‘सनातनचे संत साधना शिकवत असल्याने ते गुरुच आहेत.’ सनातनच्या संतांची अनेक वैशिष्ट्ये आहे. त्यांतील एक वैशिष्ट्य, सनातनचे संत शाब्दिक ज्ञानाद्वारे केवळ तात्त्विक माहिती सांगत नाहीत, तर अनुभूती आणि दैवी पालट यांचे विश्लेषण करून त्यांमागील कार्यकारणभाव शोधून त्यातून समष्टीला प्रायोगिक अध्यात्म शिकवतात. या प्रकारे ‘अनुभूती आणि दैवी पालट यांतून शिकवणे’, याला गुरूंची ‘शब्दातीत शिकवण’, असे म्हणतात. सद्गुरु कुवेलकरआजी यांच्यात झालेल्या दैवी पालटांच्या माध्यमातून अशीच एक शब्दातीत शिकवण सद्गुरु कुवेलकरआजी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टीला दिली आहे. या अनमोल शिकवणीसाठी दोन्ही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
सनातनच्या संतांचे वैशिष्ट्य
‘सनातनचे संत शाब्दिक ज्ञानाद्वारे केवळ तात्त्विक माहिती सांगत नाहीत, तर अनुभूती आणि दैवी पालट यांचे विश्लेषण करून त्यांमागील कार्यकारणभाव शोधून त्यातून समष्टीला प्रायोगिक अध्यात्म शिकवतात.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०२२, रात्री ८.३०)
|