नाशिक येथील सप्तशृंगी मातेच्या मूळ मूर्तीऐवजी चांदीच्या उत्सवमूर्तीवरच अभिषेक !
नाशिक – येथील श्री भगवतीदेवी सप्तशृंगी मातेचे स्वरूप (मूर्ती) संवर्धन आणि देखभाल प्रक्रियेच्या काळात मूर्तीवरील शेंदूर काढल्यानंतर प्रतिदिन होणार्या पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात सामग्री वापरण्यासाठीचे पालट करण्यात आले आहेत.
श्री भगवती स्वरूपाच्या निरंतर पूजेसाठी हा पालट महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाणी, दूध, लोणी, मध, साखर आणि नारळपाणी, तसेच तूप यांचा वापर बंद करण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून भाविकांच्या योगदानातून सिद्ध करण्यात आलेल्या श्री भगवतीच्या २५ किलो चांदीच्या उत्सवमूर्तीवरच पंचामृत महापूजा करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. ‘विश्वस्त संस्था आणि पुजारी वर्ग यांनी निर्धारित केलेले महत्त्वाचे सण, उत्सव अन् मुहूर्त वगळता इतर सर्व दिवशी चांदीच्या उत्सवमूर्तीवरच श्री भगवतीची पंचामृत महापूजा नियोजित असेल’, असे विश्वस्त संस्थेने घोषित केले.