तूप हे अमृतासमान असल्याने ते घरी ठेवाच !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६२
‘सर्पिः वातपित्तप्रशमनानाम् (श्रेष्ठम्) ।’ असे चरकसंहितेत (अध्याय २५, श्लोक ४० मधील निवडक अंश) सांगितले आहे. ‘तूप हे वात आणि पित्त यांचे विकार दूर करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे’, असा याचा अर्थ आहे. दैनंदिन आहारामध्ये, तसेच विविध रोगांच्या आत्ययिक अवस्थांमध्ये (‘इमर्जन्सी’मध्ये) तुपाचा पुष्कळ चांगला उपयोग होतो. असे तूप प्रत्येकाकडे असायलाच हवे. अनेकांना वाटते की, तूप महाग असते. आपल्याला परवडणार नाही; परंतु ‘तूप महाग असले, तरी शरिरासाठी अत्यावश्यक आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. चॉकलेट, बिस्किटे, चिप्स, शेव, चिवडा, फरसाण, अन्य फराळ, तसेच भजी, वडापाव, पिझ्झा इत्यादी आरोग्याच्या दृष्टीने अनावश्यक पदार्थांवर होणारा (अप)व्यय वाचवून तो व्यय (खर्च) तुपावर करा. घरी तूप बनवण्यासाठी दुधाच्या सायीचे दही लावा. ते घुसळून लोणी काढा. हे लोणी पाण्याने स्वच्छ धुऊन कढवा, म्हणजे तूप बनेल. हे घरचे साजूक तूप मिळाल्यास फारच चांगले; परंतु ते नसेल, तर पेठेत (बाजारात) विकत मिळणारे तूप घ्या. देशी गायीचे तूप खाणे आदर्श आहे; पण ते शक्य नसेल, तर पेठेत मिळणारे सामान्य गायीचे तूप विकत घ्या. प्रत्येकाच्या घरी न्यूनतम अर्धा किलो तूप नेहमी असावे. हे किती आवश्यक आहे, हे आगामी चौकटींतून लक्षात येईल.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२२)