अन्वेषणात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपनिरीक्षक निलंबित !
नंदुरबार येथील विवाहितेचे संशयास्पद मृत्यू प्रकरण
नंदुरबार – जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे आणि पोलीस उपनिरीक्षक बी.के. महाजन यांना निलंबित केले आहे. ‘मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली’, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात पीडितेच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार पुनर्शवविच्छेदन झाले असून या प्रकरणात न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा कायम आहे.
या प्रकरणात आधी २ पोलीस अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचारी यांचे स्थानांतर करण्यात आले होते; मात्र ‘पोलिसांचे स्थानांतर नव्हे, तर यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करावी’, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. चित्रा वाघ आणि सर्वपक्षीय नेते यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणात ठपका ठेवत वरील कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
१. पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, १ ऑगस्ट २०२२ या दिवशी तालुक्यातील वावी येथील रहिवाशी रणजित ठाकरे आणि अन्य एका जण यांनी बळजोरीने पीडितेला वाहनात बसवून गावाबाहेर नेले. पीडितेने नातेवाइकांना दूरभाष करून याविषयी सांगितले.
२. काही काळातच तिने (पीडितेने) वावी येथील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. कुटुंबीय घटनास्थळी पोचण्याआधीच ग्रामस्थांनी तिचा मृतदेह उतरवला होता. या वेळी ‘पुरावे नष्ट केले गेले’, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.
३. तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगूनही मृत पावलेल्या पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात याविषयी कुठलीही पडताळणी केली नाही. (यातील दोषी वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना आजन्म कारावासाची शिक्षा करायला हवी. – संपादक)
४. वडिलांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता घराशेजारच्या शेतात खड्डा करून तेथील मिठातच तो पुरून ठेवला होता.
संपादकीय भूमिकाउत्तरदायी पोलिसांना बडतर्फ करण्यासह अशा कामचुकार पोलिसांना कारागृहात डांबणे आवश्यक ! |