गोंदिया येथे एकाच ट्रकमध्ये कोंबल्याने श्वास गुदमरून १२० विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली !
गोंदिया – जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथील शासकीय आदिवासी शाळेतील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना एकाच ट्रकमध्ये कोंबल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे. ही घटना २४ सप्टेंबरच्या रात्री घडली. खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. तिथून रात्री विलंबाने परत येत असतांना ही घटना घडली. ३ मुलींना उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हालवण्यात आले आहे.
दोषींवर विभागीय कारवाई करण्यात येणार !
‘या प्रकरणात प्राथमिकदृष्ट्या शाळेचे मुख्याध्यापक दोषी दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी त्यांनी ३-४ बसगाड्यांची व्यवस्था करायला हवी होती. ट्रक हा पर्याय असूच शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला असून दोषींवर विभागीय कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचलवार यांनी दिली.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चौकशीचा आदेश !
गोंदिया जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली असून सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
संपादकीय भूमिकाशाळेतील विद्यार्थ्यांना बसने नव्हे, तर जनावरांप्रमाणे ट्रकमधून कोंबून नेणार्या शाळेच्या मुख्याध्यापकांना बडतर्फ करायला हवे ! |