कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची मूर्तीसंवर्धन प्रक्रिया अवैध ! – शिवसेना
कोल्हापूर – कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीसंवर्धनाची प्रक्रिया अवैध असून ती जनतेला अंधारात ठेवून केली आहे. याला राज्यशासन उत्तरदायी असून या कामात सहभागी असणार्या देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सचिव, आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी त्यागपत्र द्यावे, तसेच या सर्वांवर गुन्हे नोंद करावेत, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना देण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार, सुनील मोदी, रविकिरण इंगवले अन् हर्षल सुर्वे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. पुरातत्व विभागाने संवर्धनाच्या नावाखाली मूर्तीची तात्पुरत्या रासायनिक प्रक्रियेद्वारे डागडुजी केली. ही गोष्ट लाखो भाविकांच्या श्रद्धेला बाधा आणणारी आहे. एका पूजा करणार्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला असून वास्तव लोकांसमोर उघड होणे आवश्यक आहे.
२. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची सद्यस्थिती कशी आहे ?
३. आठ दिवसांपूर्वी अचानक असे काय घडले की, जिल्हा प्रशासनातील प्रमुख लोकांनी मंदिरात ठाण मांडून संवर्धनाचे काम तातडीने केले ?
४. काही मान्यवर, तज्ञ आणि पुजारी यांची समिती गठन करून मूर्ती पालटायची कि नाही, याचा विचार व्हावा.