नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप !
जळगाव, २३ सप्टेंबर (वार्ता.) – येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने सनातन संस्थेच्या संस्कार वह्यांचे आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश बागुल, तसेच स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाय्.एस्. पाटील आणि शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश बागुल यांनी संस्कार वहीचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी प्रतिदिनच्या जीवनात कसे आचरण करावे ? याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजय माळी यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. निंबा माळी यांनी केले.
सनातन संस्थेची वही भारतीय संस्कृतीचे ज्ञान देते !
नितेश अग्रवाल यांनी व्यक्त केलेले मनोगत !
ज्ञान हे मनुष्याला वैभवशाली बनवते. सनातन संस्थेची वही ही केवळ वही नसून ती संस्कार वही आहे. भारतीय संस्कृतीचे ज्ञान देणारी वही आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र आणि समाज यांच्या प्रती योगदान देण्याची प्रवृत्ती निर्माण व्हायला साहाय्य होईल. या उपक्रमात सहभाग घेण्यात मला विशेष आनंद वाटला.