संभाजीनगर येथे अयोध्या येथील ३० कलाकारांसह प्रथमच रामलीला कार्यक्रमाचे आयोजन !
संभाजीनगर – नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत शहरातील शेंद्राजवळील इस्कॉनचे राधा-निकुंजबिहारी नवनिर्माणधीन मंदिरात प्रथमच ३ सहस्र रामभक्तांच्या उपस्थितीत ४० बाय ३५ फुटांच्या भव्य रंगमंचावर रामलीलेचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्या येथून ३० कलाकारांचे पथक शहरात येणार आहे. सर्वांना नि:शुल्क प्रवेश आहे. प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता आरती आणि हरिकीर्तन यांनी महोत्सवाचा प्रारंभ होईल. रामलीलेनंतर महाप्रसाद वितरित केला जाणार आहे, अशी माहिती ‘श्री रामलीला महोत्सव समिती’चे विशाल लदनिया यांनी २१ सप्टेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, विजयादशमीच्या दिवशी २० सहस्र भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे. शेवटच्या दिवशी दसरा मेळावा आणि रावण दहन केले जाणार आहे. महोत्सवासाठी प्रांगणात २० सहस्र स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप असेल.