रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात दत्तमाला मंत्रपठण करत असतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !
१. दत्तमाला मंत्रपठण करत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी नवग्रह देवतांना प्रार्थना होणे
‘२४.६.२०२१ या दिवशी मी सकाळी १० ते १०.३० या वेळेत रामनाथी आश्रमात बसून दत्तमाला मंत्रपठण करत होते. मंत्रपठणाला आरंभ झाल्यावर माझे मन पूर्ण निर्विचार झाले. मंत्रपठणाचे एक आवर्तन झाल्यावर नवग्रह श्लोक म्हणतांना माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी ‘हे नवग्रह देवतांनो, या मंत्रपठणाच्या तेजाने प.पू. गुरुमाऊलीची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) प्राणशक्ती वाढू दे. त्यांना होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास नष्ट होऊन त्यांच्या अवयवांची क्षमता वाढू दे’, अशी प्रार्थना झाली.
२. साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य
२ अ. नवग्रह देवतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर पुष्पे अर्पण करणे आणि नवग्रह देवतांनी ‘श्री विष्णवे नमः ।’, हा नामजप करणे : थोड्या वेळाने मला दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टर पलंगावर पहुडले असून आम्ही त्यांच्या खोलीबाहेर पठण करत आहोत. नंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत मला नवग्रह देवतांचे अस्तित्व जाणवले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टर बसलेले दिसले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर नवग्रह देवतांनी पुष्पे अर्पण केली आणि त्यांना म्हणाले, ‘काय आज्ञा आहे ?’
प.पू. गुरुमाऊली म्हणाली, ‘साधकांच्या साधनेसाठी अनुकूलता हवी आहे.’ त्यानंतर ‘नवग्रह देवता प.पू. गुरुमाऊलीच्या चरणांजवळ बसून ‘श्री विष्णवे नमः ।’, हा नामजप करत आहेत’, असे मला जाणवले.
२ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विराट रूप धारण करून वाईट शक्तींचे निर्दालन केले’, असे दिसणे आणि ईश्वरी राज्याची पहाट अनुभवणे : थोड्या वेळाने मला दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी विराट रूप धारण केले असून ते वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत आहेत. गुरुमाऊलीने वाईट शक्तींचे निर्दालन केले. देवतांचा विजय होऊन सर्व देवता आनंदाने जयघोष करत आहेत. त्या वेळी मला तो विजयोत्सव अनुभवता आला. ‘ही ईश्वरी राज्याची पहाट आहे’, असे मी अनुभवत आहे. सगळीकडे आनंद लहरी प्रक्षेपित होत आहेत.’ त्या वेळी मला पुष्कळ हलके आणि शांत वाटत होते. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मी ही स्थिती अनुभवत होते.
‘हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे मला हे अनमोल क्षण अनुभवता आले’, त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२१)
|