मादक पेयांचे उत्पादन आणि सेवन प्रतिबंधित करण्याविषयीच्या याचिकेस सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
‘योग्य प्रमाणात घेतलेली मादक पेये आरोग्यासाठी चांगली असू शकतात’, असे लोक म्हणतात ! – सर्वाेच्च न्यायालय
नवी देहली – देहलीमध्ये मादक पेयांचे उत्पादन, वितरण आणि सेवन प्रतिबंधित किंवा नियमन करण्यासाठी भाजपचे नेते असणारे अधिवक्ता श्री. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, हे प्रकरण धोरण सिद्ध करण्याशी संबंधित आहे आणि त्यावर न्यायालयाने निर्णय देण्याची आवश्यकता नाही. ‘काही लोक म्हणतात, ‘योग्य प्रमाणात घेतलेली मादक पेये आरोग्यासाठी चांगली असू शकतात.’ सिगारेटविषयी असे कुणीही म्हणत नाही. ही एक धोरणात्मक गोष्ट आहे, कृपया समजून घ्या’, असे सरन्यायाधीश उदय लळित यांनी या वेळी सांगितले.
१. न्यायालयाच्या निर्णयानंतर अधिवक्ता उपाध्याय यांनी पुन्हा युक्तीवाद करतांना सांगितले की, अल्कोहोल असणारी पेये ही सिगारेटसारखीच हानीकारक आहेत. त्यावर चेतावणीचे लेबल आहे. मी मर्यादित मागणी करत आहे की, अशा पेयांवरही चेतावणी लेबल असावे. मला आशा आहे की, त्याने लोकांना, विशेषतः तरुणांना मोठे साहाय्य होईल.
२. यानंतरही न्यायालयाने ही धोरणात्मक गोष्ट असल्याचे सांगत अधिवक्ता उपाध्याय यांना याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला. तसे न केल्यास ‘न्यायालय याचिका फेटाळून लावेल’, असेही सांगितले.
३. सरन्यायाधिशांच्या टिपणीनंतर अधिवक्ता उपाध्याय यांनी हे प्रकरण मागे घेण्याचे आणि कायदा आयोगाकडे (विधी) जाण्याची अनुमती मागितली. यानंतर त्यांना याचिका मागे घेण्याची अनुमती देण्यात आली; मात्र कायदे आयोगाकडे जाण्यास मनाई करण्यात आली.