हिंदी भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र !
भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधक आणि साधिका यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती आपण २२.९.२०२२ आणि २३.९.२०२२ या दिवशी पाहिल्या. आजच्या लेखात आपण ४.६.२०२१ च्या रात्रीच्या हिंदी भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि त्यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया.
१. अनुभूती
१ अ. सत्संगात बोलतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना जाणवले की, त्यांचा स्वर स्वतःच्या मुखातून नाही, तर ब्रह्मांड पोकळीतून येत आहे.
१ आ. त्या वेळी त्यांच्या समवेत बसलेले श्री. सोहम् सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पृथ्वीवर नसून अंतराळात आहेत आणि पोकळीतून त्यांचा स्वर येत आहे. तसेच तो आवाज संपूर्ण ब्रह्मांडात पसरत आहे’, असे जाणवले.
१ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘त्या वेळी मला असे जाणवले की, ‘मी काहीच करत नसून ब्रह्मांड पोकळी हाच मूळ स्रोत आहे’, हे यातून लक्षात येते.’’
२. वरील अनुभूती येण्यामागील कु. मधुरा भोसले यांना मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान
‘४.६.२०२१ च्या रात्रीच्या हिंदी भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांना मार्गदर्शन करत होत्या. तो भक्तीसत्संग ‘आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी भावभक्तीच्या स्तरावर प्रयत्न करून ईश्वराची कृपा कशी संपादन करायची ?’ या संदर्भातील भक्तीसत्संग श्रुंखलेतील होता. या श्रुंखलेतील भक्तीसत्संगांमध्ये निसर्गातील पंचतत्त्वांचे स्वरूप आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व सविस्तररित्या विशद केले होते. ४.६.२०२१ च्या दिवशी पंचतत्त्वांपैकी ‘आपतत्त्वाच्या ’ संदर्भातील विषय भक्तीसत्संगात घेण्यात आला होता. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री. सोहम् सिंगबाळ यांना आलेल्या विविध अनुभूतींमागील शास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
२ अ. भक्तीसत्संगाच्या वेळी श्री. सोहम् सिंगबाळ यांचे मन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनाशी एकरूप झाल्यामुळे दोघांनाही एकसारख्या अनुभूती येणे : पंचमहाभूतांची निर्मिती ब्रह्मदेवाच्या संकल्पाने निर्गुणातून झालेली आहे. जेव्हा पंचमहाभूते निर्गुणातून सगुणात येत असतात, तेव्हा त्यांचे प्राकट्य ब्रह्मांड पोकळीतून होते. हे प्राकट्य निर्गुण-सगुण स्तरावरील असून ते सूक्ष्मतम असते. त्याची अनुभूती केवळ निर्गुणातील ईश्वराशी अंशात्मकरित्या एकरूप झालेले अवतारी संतच घेऊ शकतात. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या श्रीमहालक्ष्मीच्या अंशावतार असून त्या श्रीभूदेवीचे रूप आहेत. त्यामुळे त्यांना ‘आपतत्त्वाशी संबंधित असणारा भक्तीसत्संग घेत असतांना वरीलप्रमाणे विविध अनुभूती आल्या. श्री. सोहम् सिंगबाळ यांच्यामध्ये शिष्यभाव आहे. त्यामुळे ते श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे मायेतील ‘आई’ या नात्याने न पहाता आध्यात्मिक गुरु म्हणून पहातात आणि त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भक्तीसत्संगाच्या वेळी श्री. सोहम् सिंगबाळ यांचे मन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनाशी एकरूप झाल्यामुळे दोघांनाही एकसारख्या अनुभूती आल्या.
२ अ १. सत्संगात बोलत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना जाणवले, ‘त्यांचा स्वर स्वतःच्या मुखातून नाही, तर ब्रह्मांड पोकळीतून येत आहे’, यामागील अध्यात्मशास्त्र : भक्तीसत्संगात बोलत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या देहपोकळीमध्ये निर्गुण-सगुण स्तरावरील ईश्वरी चैतन्य कार्यरत झाले. त्यामुळे त्यांच्या देहपोकळीमध्ये ब्रह्मांड पोकळीची स्पंदने कार्यरत झाली. जेव्हा त्या भक्तीसत्संगातील विषय सांगू लागल्या, तेव्हा त्यांच्या वाणीमध्ये आकाशतत्त्व कार्यरत झाले आणि मुखामध्ये ब्रह्मांडपोकळीतील स्पंदने कार्यरत झाली. त्यामुळे त्यांना असे जाणवले, ‘त्यांचा स्वर स्वतःच्या मुखातून नाही, तर ब्रह्मांड पोकळीतून येत आहे’
२ अ २. वरील अनुभूतीच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत बसलेले त्यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पृथ्वीवर नसून अंतराळात आहेत आणि पोकळीतून त्यांचा स्वर येत आहे. तसेच तो आवाज संपूर्ण ब्रह्मांडात पसरत आहे’, असे जाणवण्यामागील अध्यात्मशास्त्र : या भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी निर्गुण-सगुण स्तरावरील ईश्वरी चैतन्य कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहातील देहपोकळी ब्रह्मांड पोकळीशी एकरूप झाली होती. त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व पृथ्वीमय सगुण देहात नसून आकाशमय निर्गुण स्तरावर होते. अंतराळातील पोकळीमध्ये आकाशतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे श्री. सोहम् सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पृथ्वीवर नसून अंतराळात असल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे ‘आपतत्त्वाच्या संदर्भातील विषय मांडत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखामध्ये आकाशतत्त्वमय ब्रह्मांड पोकळीची स्पंदने कार्यरत झाल्यामुळे त्यांचा स्वर पोकळीतून येत आहे, तसेच तो आवाज संपूर्ण ब्रह्मांडात पसरत आहे’, असे जाणवले.
२ अ ३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘त्या वेळी मला असे जाणवले, ‘मी काहीच करत नसून ब्रह्मांड पोकळी हाच मूळ स्रोत आहे’, हे यातून लक्षात येते,’ असे जाणवण्यामागील अध्यात्मशास्त्र : श्रीविष्णूच्या नाभीकमलातून प्रगट झालेल्या ब्रह्मदेवाचे अस्तित्व ब्रह्मलोकात आहे. ब्रह्मदेवाच्या कृपेने संपूर्ण सृष्टीची निर्मिती होतांना त्याचे बीज ब्रह्मांडपोकळीतून प्रगट झाले आणि त्यानंतर या संकल्परूपी बिजातून प्रथम पंचतत्त्वे आणि त्रिगुण प्रगटले अन् त्यानंतर ब्रह्मांडरूपी सृष्टीची निर्मिती झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेमुळे त्यांना त्यांच्या मूळस्वरूपाचे ज्ञान झाले आणि ब्रह्मांडपोकळीमध्ये कार्यरत असणार्या ईश्वराच्या निर्गुण चैतन्याचा अनुभूतीजन्य बोध झाला. त्यामुळे त्यांना वरीलप्रमाणे अनुभूती आली. या अनुभूतीला ‘स्वरूपाची अनुभूती येणे’ किंवा ‘स्वस्वरूपाचे ज्ञान होणे’, असे म्हणतात. अशी अनुभूती घेण्यासाठी निर्गुण-सगुण स्तरावरील ईश्वरी चैतन्य पेलण्याची क्षमता असणे आवश्यक असते. त्यामुळे अशी अनुभूती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासारख्या शिवात्मा-शिवदशा अनुभवणार्या आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांनाच येऊ शकते.’
३. कृतज्ञता !
‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांना आलेल्या ब्रह्मांडपोकळीच्या संदर्भात वरील अनुभूतींमागील अध्यात्मशास्त्राचे ज्ञान मिळाले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |