नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तुत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान इत्यादींचा समावेश आहे.

१. नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध या विधींसंबंधी महत्त्वाच्या सूचना

१ अ. शास्त्र : हे विधी आपल्या पितरांना गती मिळावी, या उद्देशाने केले जातात. त्यासाठी ‘प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १/१० (एक दशांश) व्यय करावा’, असे शास्त्र सांगते. आपल्या शक्तीनुसार व्यय केला तरी चालतो.

१ आ. हे विधी कोण करू शकतो ?

१. हे काम्यविधी आहेत. ते कुणालाही करता येतात. ज्यांचे आई-वडील हयात आहेत, त्यांनाही करता येतात.

२. अविवाहित असणार्‍यांनाही एकट्याने हे विधी करता येतात. विवाहित असल्यास पती-पत्नीनी बसून हा विधी करावा.

१ इ. निषेध : स्त्रियांनी मासिक पाळीचे दिवस पाळणे अत्यंत जरूरीचे आहे. स्त्री गरोदर असल्यास ५ मासांनंतर करू नये. घरात शुभकार्य म्हणजे लग्न, मौजीबंधन वगैरे काही झाले असल्यास अथवा घरात कुणी व्यक्ती मृत झाली असल्यास हे विधी एक वर्षापर्यंत करू नयेत.

१ ई. पद्धत : विधी करण्याकरता पुरुषांसाठी धोतर, उपरणे, बनियन, तर महिलांकरता साडी, झंपर (पोलके) आणि परकर इत्यादी नवीन वस्त्रे (काळा किंवा हिरवा रंग नसावा) लागतात. ही नवीन वस्त्रे नेसून विधी करावयाचा असतो. नंतर ती वस्त्रे दान करावी लागतात. तिसर्‍या दिवशी सुवर्ण नागाच्या (सव्वा ग्रॅम) एका प्रतिमेची पूजा करून दान करतात.

१ उ. विधीसाठी लागणारा कालावधी : वरील तीनही विधी वेगवेगळे आहेत.

नारायण-नागबली हा विधी तीन दिवसांचा असतो, तर त्रिपिंडी श्राद्ध विधी एक दिवसाचा असतो. वरील तिन्ही विधी करावयाचे असल्यास तीन दिवसांत करता येतात. स्वतंत्र एक दिवसाचा विधी करावयाचा असल्यासही करता येतो.

२. नारायणबली

२ अ. उद्देश : ‘दुर्मरणाने मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या माणसाचे क्रियाकर्मांतर न झाल्यामुळे त्याची प्रेतत्वनिवृत्ती झाली नसेल, तर त्याच्या लिंगदेहाला गती न मिळाल्यामुळे तो भटकत रहातो. असा लिंगदेह कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो, तसेच कोणत्याही प्रकारे वंशजांना त्रास देतो. अशा लिंगदेहाला गती देण्यासाठी नारायणबली करावा लागतो.’

२ आ. विधी

१. विधी करण्यास योग्य काल : नारायणबली हा विधी करण्यासाठी कोणत्याही मासाची शुक्ल एकादशी आणि द्वादशी योग्य असते. एकादशीला अधिवास (देवतास्थापना) करून द्वादशीला श्राद्ध करावे. (सध्या बहुतेक जण एकाच दिवशी विधी करतात.) संततीप्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास दांपत्याने स्वतः हा विधी करावा. संतती प्राप्तीसाठी हा विधी करावयाचा असल्यास श्रवण नक्षत्र, पंचमी किंवा पुत्रदा एकादशी यांपैकी एका तिथीला केल्यास अधिक लाभ होतो.

२. विधी करण्यास योग्य स्थान : नदीतीरासारख्या पवित्र जागी हा विधी करावा.

(क्रमशः)

(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)’)