मॉलमधील वाईनविक्री शेतकर्यांच्या हिताची ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री
लोकांची मते जाणून १५ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन
धान्यापासून वाईन किंवा दारू बनवण्याच्या प्रक्रियेवर बरेच बोलले जाते. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी असे प्रकल्प चालवले जातात; मात्र यामुळे युवापिढी मद्यपी होईल, त्याचे काय ? ‘सरकारने याचाही विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा’, असेच जनतेला वाटते !
मुंबई – मॉलमधील वाईनविक्री शेतकर्यांच्या हिताची आहे. विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर काम करत आहेत. येत्या १५ दिवसांत याविषयीचा अहवाल माझ्याकडे येईल. त्यानंतर मी स्वत: याचा अभ्यास करून लोकांची मते काय आहेत, हे जाणून घेतल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे वक्तव्य राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.
उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी केलेल्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया?@shambhurajdesai#Shambhurajdesai #Wine #Farmers #MTCard pic.twitter.com/89tv9Umthw
— Mumbai Tak (@mumbaitak) September 22, 2022
या वेळी शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘मॉलमध्ये वाईन विक्रीविषयी आम्ही लोकांची मते जाणून घेतली. अनेकांनी याविषयी सूचना केल्या आहेत. त्यानुसार या निर्णयाच्या समर्थनात आणि विरोधात किती जण आहेत, त्याचा अभ्यास चालू आहे. माहिती संकलित झाल्यानंतर आणि त्यावर माझ्या अभ्यास झाल्यानंतर मी याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन. त्यांना याविषयी सविस्तर माहिती देईन. मला विश्वास आहे की, या निर्णयाला भाजपही पाठिंबा देईल.’’ यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र भाजपने केलेल्या विरोधानंतर सरकारने निर्णय मागे घेतला.