सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देहलीत मशिदीमध्ये जाऊन घेतली मुसलमान नेत्याची भेट !
नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देहलीमध्ये कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीला भेट देऊन ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख डॉ. उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. ही बैठक जवळपास १ घंटा चालली. सरसंघचालकांसमवेत संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमार हे उपस्थित होते. याविषयी उमर इलयासी यांचा मुलगा सुहैब इलयासी यांनी सांगितले की, या भेटीने देशभरात एक चांगला संदेश गेला आहे. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे चर्चा केली. आमच्या निमंत्रणानंतर ते भेटीसाठी आले. सरसंघाचालक यापूर्वी काही मुसलमान नेत्यांना भेटले आहेत. यात देहलीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, माजी निवडणूक आयुक्त एस्.वाय. कुरेशी आदींचा समावेश आहे.
संघ प्रमुख मोहन भागवत ने गुरुवार को प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी समेत अन्य मुस्लिम नेताओं से मुलाकात की…#RSS #mohanbhagwat
— AajTak (@aajtak) September 22, 2022
इलियासी याची भेट एक सामान्य संवाद प्रक्रिया ! – संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर
संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी या भेटीविषयी म्हटले की, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सर्व क्षेत्रांतील लोकांना भेटत असतात. ही भेट एक सतत होणार्या सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्रऋषि’ ! – डॉ. उमेर अहमद इलयासी
सरसंघचालकांच्या भेटीविषयी डॉ. उमेर इलयासी यांनी सांगितले की, डॉ. मोहन भागवत आमच्याकडे येणे, हे आमचे भाग्य आहे. ते इमाम हाऊसमध्ये भेटीसाठी आले. ते आमचे ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्रऋषि’ आहेत. देशाची एकता आणि अखंडता कायम राहिली पाहिजे. आपली पूजा पद्धत वेगळी असली, तरी आपण सर्वप्रथम मनुष्य आहोत आणि आपल्यामध्ये मानवता असली पाहिजे. भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्नरत असले पाहिजे.
मदरशालाही दिली भेट !
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जुन्या देहलीतील मदरशामध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेतली. जवळपास ४५ मिनिटे ते तेथे होते. या वेळी त्यांना तेथील शिक्षकांशीही शिक्षणाविषयी चर्चा केली. सरसंघचालक विद्यार्थ्यांना म्हणाले, ‘‘तुमच्यावर देशाच्या भविष्याचे मोठे दायित्व आहे.’’