सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल्. भारमल ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित
सावंतवाडी – येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल्. भारमल यांना मुंबई विद्यापिठाचा ‘आदर्श प्राचार्य’ हा पुरस्कार मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या हस्ते प्रा. डॉ. भारमल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
प्रा. डॉ. भारमल यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एमएससी (प्राणीशास्त्र) ही पदवी प्राप्त केल्यानंतर ते वर्ष १९८७ मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता या पदावर रूजू झाले. वर्ष २००८ पासून त्यांनी प्राचार्य पदाचा भार स्वीकारला. वर्ष १९९६ मध्ये आणि वर्ष २०१२ मध्ये, अशा २ वेळा त्यांनी शिक्षण क्षेत्रात ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच्.डी.) आणि त्यानंतर एल्.एल्.बी. या पदव्या प्राप्त केल्या आहेत. महाविद्यालयाचे प्रशासन सांभाळत असतांना ते राष्ट्रीय आणि मुंबई विद्यापीठ स्तरावरील विविध समित्यांवर कार्य करत आहेत.
गौरव सोहळ्याच्या वेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राणीसाहेब श्रीमंत सौ. शुभदादेवी खेमसावंत भोसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, महाविद्यालयातील प्राध्यापक, संचालक, माजी आणि आजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.