चंद्रभागेसह इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या बैठकीत ठराव !
सोलापूर, २१ सप्टेंबर (वार्ता.) – चंद्रभागा आणि इंद्रायणी सारख्या पवित्र आणि प्रत्येक वारकर्यांचे श्रद्धास्थान असणार्या नद्या प्रदूषित झाल्याने असंख्य वारकर्यांच्या भावनांचा अनादर रोखण्यासाठी गावोगावी वारकर्यांच्या माध्यमातून लढा उभारण्याचा ठराव अखिल भाविक वारकरी मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. येथील रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. दत्तात्रय महाराज क्षीरसागर होते.
चंद्रभागा आणि इंद्रायणी या नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी विविध संघटनांकडून लढा चालू असूनही नद्या प्रदूषणमुक्त झाल्या नाहीत. त्यामुळे यापुढे वारकर्यांनी या चळवळीसाठी लढा देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, हरोहर महाराज मोरे, अभिमन्यू महाराज डोंगरे, बंडोपंत महाराज कुलकर्णी, माजी पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि महाराज मंडळी उपस्थित होते.