रेल्वेस्थानकांत आतंकवादी शिरल्याचा दूरभाष करणार्या आरोपीला अडीच मासांनी अटक
मुंबई – दादर आणि परळ या रेल्वेस्थानकांत आतंकवादी शिरल्याचा दूरभाष करणार्या आरोपीला आतंकवादविरोधी पथकाने अडीच मासांनी झारखंडमधून अटक केली आहे. राहुल श्रीपती रवीदास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुल याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये २८ जूनच्या सायंकाळी दूरभाष करून दादर आणि परळ या रेल्वेस्थानकात आतंकवादी शिरल्याचे सांगितले. त्यानुसार या रेल्वेस्थानकांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली; परंतु तेथे कोणतीही संशयित वस्तू अथवा व्यक्ती सापडल्या नाहीत. अखेर दादर रेल्वे पोलिसांनी अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर ज्या भ्रमणभाषवरून दूरभाष आला होता, त्याचा पोलिसांनी शोध चालू केला होता. अखेर अडीच मासांच्या अन्वेषणानंतर आतंकवादविरोधी पथकाने झारखंडमधून आरोपीला अटक केली. या आरोपीविरोधात यापूर्वी दोन गुन्हे नोंद करण्यात आले असून अधिक चौकशीसाठी त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.
संपादकीय भूमिकाएखाद्या गुन्हेगाराला शोधून काढण्यास अडीच मास लावणारे पोलीस देशांतर्गत लपून बसलेल्या शेकडो आतंकवाद्यांचा बिमोड करण्यास किती वर्षे लावणार ? |