खोटे आरोप करणार्यांवरील कारवाई घोषित करण्याची राज्य सरकारकडे मागणी
पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया
मुंबई – ईडीचे आरोपपत्र आणि वर्ष २००६ मध्ये मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले, तर आरोप करणार्यांवर काय कारवाई करणार ? हे राज्य सरकारने घोषित करावे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केला. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे आरोप फेटाळून लावले.
शरद पवार म्हणाले की, पत्राचाळप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. त्यात माझे नाव असल्याचे म्हटले जात आहे. चौकशी करणार्या संस्थेने न्यायालयात काय सांगितले ? राज्य सरकारमध्ये काय चर्चा झाली, याविषयीची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केला, तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीला नाही म्हणण्याची आमची भूमिका नाही. चौकशी झाल्यानंतर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल, तर काय भूमिका घेणार, हे राज्य सरकारने घोषित करावे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘शरद पवार जेव्हापासून राजकारणात आले, तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत १० ते २० सहस्र बैठका घेतल्या आहेत. राज्यात असा एकही प्रकल्प नाही, ज्यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतलेली नाही. बैठका घेणे हे त्यांना नवे नाही. पत्राचाळ प्रकल्प १९८८ पासून रखडलेला होता.’’