काटकसरी वृत्ती, उत्तम नियोजनक्षमता आणि स्वकौतुकाची अपेक्षा नसणारी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. गुलाबी दीपक धुरी (वय २३ वर्षे) !
आज, भाद्रपद कृष्ण द्वादशी (२२.९.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या कु. गुलाबी धुरी यांचा २३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मोठी बहीण कु. पूजा दीपक धुरी यांना कु. गुलाबी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
कु. गुलाबी दीपक धुरी यांना सनातन परिवाराकडून २३ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. मनमोकळेपणाने बोलणे : तिच्या मनामध्ये कुटुंबियांविषयी कधी कधी काळजीचे विचार येतात आणि याचा परिणाम तिच्या सेवेवरही होतो. तिच्या मनात कुटुंबियांविषयी असे काळजीचे विचार आल्यावर ती माझ्याशी मोकळेपणाने बोलून घेते. त्यामुळे तिला त्या विचारांवर मात करता येते.
१ आ. सध्या तिची आवड-नावड अल्प झाल्याचे जाणवले.
१ इ. ती कौटुंबिक प्रसंगात भावनाशील न होता तत्त्वनिष्ठ राहून स्वतःचे विचार मांडते.
१ ई. स्वकौतुकाची अपेक्षा नसणे : यापूर्वी तिचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये संतसेवेविषयी काही लेख प्रसिद्ध झाले होते. तेव्हा आईने भ्रमणभाषवर संपर्क करून तिचे कौतुक केले. त्या वेळी ती स्थिर होती. ‘देवच सर्व करवून घेत आहे. आपण निमित्तमात्र आहोत’, असा तिचा भाव असल्यामुळे तिला स्वकौतुकाची अपेक्षा नसते.
१ उ. इतरांनी तिच्या सेवेचे कौतुक केले, तर ती कृतज्ञताभावात रहाते.
१ ए. ती देवाच्या अनुसंधानात राहून सेवा करत असल्यामुळे तिची सेवा भावपूर्ण होते.
१ ऊ. इतरांचा विचार करणे : फेब्रुवारी २०२२ मध्ये माझ्या चुलतभावाचा (श्री. गणेश धुरी यांचा) विवाह सुनिश्चित झाला होता. याप्रसंगी ‘आपण त्यांना कोणते साहाय्य करू शकतो ?’, हा विचार करून तिने त्यांना आवश्यक ते सर्व साहाय्य केले.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. काटकसरी वृत्तीमुळे आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी करून गुरुधनाची हानी टाळणे : एकदा मी आणि गुलाबी आठवड्याच्या बाजारात खरेदीसाठी गेलो होतो. तिने घरामध्ये आवश्यक असणार्या साहित्याची सूची बनवली होती. त्या वेळी साहित्य खरेदी करून झाल्यावर मी बाजारामध्ये स्वतःला आवडणार्या वस्तू घेण्याचा विचार केला. तेव्हा गुलाबीने सांगितले, ‘‘आपण अनावश्यक वस्तू खरेदी करून गुरुधन वाया घालवत आहोत. आपल्याला आवश्यक तेवढेच गुरुधन वापरायचे आहे.’’ या प्रसंगावरून ‘आपल्याला एखादी वस्तू आवश्यक आहे का ?’ याचा विचार करूनच ती खरेदी केली पाहिजे’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.
२ आ. उत्तम नियोजनक्षमतेमुळे घराच्या डागडुजीचे काम अल्पावधीत होणे : आम्ही आमच्या घराची डागडुजी करण्याचे नियोजन करत होतो. तेव्हा तिने मला ‘घराची डागडुजी करण्यासाठी कोणते आणि किती साहित्य लागणार ? त्याला एकूण किती व्यय येणार? ते काम किती दिवसांत पूर्ण होऊशकते ?’, या सूत्रांची व्याप्ती काढायला सांगितली. त्यामुळे आम्हाला कामाचे व्यवस्थित नियोजन करता आले आणि अल्पावधीमध्ये घराचे काम पूर्ण झाले. यातून ‘प्रत्येक कृती करतांना तिची व्याप्ती काढून लिखित स्वरूपामध्ये नियोजन केले, तर आपली कृती परिपूर्ण होते’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.
२ इ. पूर्वग्रह न ठेवता नातेवाइकांशी सहजतेने वागणे : आम्ही एका नातेवाइकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणार होतो; परंतु माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्वग्रह असल्याने मला ‘त्यांच्याकडे जाऊ नये’, असे तीव्रतेने वाटत होते. मी हे गुलाबीला सांगितल्यावर तिने मला योग्य दृष्टीकोन दिला. त्यानंतर आम्ही त्या नातेवाइकांच्या घरी गेल्यावर ती त्यांच्याशी अगदी सहजतेने बोलत होती. ‘आपल्या मनात येणार्या पूर्वग्रहाच्या (भूतकाळाच्या) विचारांवर मात करून वर्तमान काळात राहिल्यास आनंद मिळतो. वर्तमान काळातील आनंद कसा घ्यायचा ?’, हे मला या प्रसंगात तिच्याकडून शिकता आले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, आपण मला कु. गुलाबीकडून शिकण्याची संधी दिलीत आणि ही सर्व सूत्रे माझ्याकडून लिहून घेतलीत, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. पूजा दीपक धुरी (कु. गुलाबी धुरी हिची मोठी बहीण) (वय २६ वर्षे), साळगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (११.८.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |