आध्यात्मिक त्रासामुळे झालेल्या मनाच्या अत्यंत वाईट स्थितीमध्ये सर्वथा सांभाळणारे आणि त्या स्थितीतून बाहेर काढून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. मनाच्या स्थितीचा अभ्यास न केल्याने मन आणि बुद्धी वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाणे
‘वर्ष २००५ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला मनाच्या स्थितीकडे लक्ष देण्यास सांगितले होते; पण मला कधी मनाकडे लक्ष देण्यास जमले नाही. माझी नेहमी हतबल मानसिकता असायची. मला कुठल्याही स्थितीतून मार्ग काढणे जमायचे नाही. यातच ‘माझे मन आणि बुद्धी कधी वाईट शक्तींच्या नियंत्रणात गेले’, हे मला कळलेच नाही. या त्रासामुळे मला सेवा सुचणेही बंद झाल्याने मला पूर्ण वेळ उपाय करण्यास सांगण्यात आले. सेवा म्हणजे माया किंवा कार्यच आहे; पण पहिल्यापासून मला ‘संकलन कसे करायचे ?’, हे ज्ञात नसतांना आणि कुणीही मार्गदर्शन करायलाही नसतांना देव मला ‘आतून सेवा कशी करायची ?’, हे सुचवायचा. त्यामुळे मला सेवा हे अनुसंधान वाटायचे. त्या तुलनेत उपायांतून अनुसंधान साधणे मला कठीण वाटायचे. त्यामुळे मला पुष्कळ निराशा यायची.
माझ्या या स्थितीमुळे माझी साधनेची अनेक वर्षे वाया गेली. पूर्वी साधना करत नसतांना मनाची जशी स्थिती असायची, त्यापेक्षा पुष्कळ वाईट स्थिती झाल्याने मला ‘साधनेने काहीच लाभ होत नाही. साधना करू नये’, असे वाटायचे. या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही मला सापडत नव्हता.
२. होमिओपॅथीच्या औषधांचा मनावर चांगला परिणाम होणे; परंतु रागाचे प्रमाण वाढल्यावर औषधे बंद करावी लागणे
साधारण १० वर्षांपूर्वी मी पनवेल येथील होमिओपॅथी वैद्य मिलिंद जोशी यांचे उपचार घेत होते. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘तुमचे ‘व्यक्तीमत्त्व’ दबलेले आहे (Supressed personality) आणि त्यासाठी ६ मास औषधे घ्यावी लागतील.’’ माझ्या मनात दबलेल्या भावना व्यक्त होण्यासाठी मी घेत असलेल्या औषधांचा सकारात्मक परिणाम होत होता; परंतु साधारण ४ मासांनी मला पुष्कळ राग येऊ लागला. त्यामुळे मी साधकांवर अकारण चिडत असे. त्या वेळी मी हे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी औषधांच्या परिणामामुळे राग येत असल्याचे साधकांना सांगायला सांगितले. मी तसे केले. साधकांनीही मला सांभाळून घेतले. काही दिवसांनी त्या रागाची तीव्रता वाढू लागल्यावर मला पुष्कळ भीती वाटू लागली. मी हे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी औषधे बंद करून मन शांत करणारी औषधे घेण्यास सांगितले. आध्यात्मिक त्रासामुळे होणार्या मानसिक त्रासासाठी ही औषधे होती. त्यामुळे मला पुष्कळ ग्लानी यायची. त्यानंतर १० वर्षे मला असा अकारण राग येत नव्हता.
३. औषधे बंद केल्यावर रागाचे प्रमाण वाढणे; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यातून बाहेर काढून मन निर्मळ करणे
जून २०२१ पासून शारीरिक स्वास्थ्यासाठी पहाटे लवकर उठून व्यायाम करणे, माझ्याकडून संकलन सेवेत झालेल्या चुकांमुळे घेतलेल्या प्रायश्चित्तांसाठी अधिक सेवा करणे आणि माझे उपाय यांचा दिनक्रम बसवण्यासाठी मी ही औषधे घेणे बंद केले. पुष्कळ त्रास झाला, तर एखाद-दोन दिवस औषधे घेऊन मी पुन्हा नवीन दिनक्रम चालू ठेवत असे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये पुन्हा मला साधकांचा राग येऊन माझी चिडचिड होणे आणि मोठ्याने बोलणे, हे त्रास होऊ लागले. तेव्हा ‘साधकांवर रागावण्याचा मला अधिकारच नाही’, हा विचार मनात असल्याने ‘माझ्या रागावण्याचा साधकांवर काय परिणाम होतो ?’, यापेक्षा मलाच त्या वागण्याचा त्रास होऊ लागला. यावर मी माझ्या स्तरावर काही उपाययोजना काढल्या; परंतु शेवटचा उपाय म्हणून मी विभागात मौन पाळण्याचे प्रायश्चित्त घेतले. त्याच काळात साधकांना सेवेत इतक्या शंका असायच्या की, मला थोडे थोडे बोलावे लागायचे. तीन दिवसांनंतर अकस्मात् देवाने माझे मन शांत आणि निर्मळ केल्याचे माझ्या लक्षात आले. मला जीवनात ज्यांनी पुष्कळ त्रास दिला होता, त्यांनाही माझ्याकडून क्षमा केली गेली आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी सद्भावना जागृत झाली. तेव्हापासून मला होणारा मानसिक त्रास उणावून माझे मन शांत होत गेले आणि माझ्या आनंदातही वाढ झाली. त्यानंतर देवही मला चांगली सेवा सुचवू लागल्याने माझे मन सेवेत रमू लागले.
४. मनाच्या स्थितीत पालट झाल्याने परिस्थिती स्वीकारता येणे
४ अ. मनाच्या स्थितीत पालट झाल्यावर शारीरिक त्रासांत वाढ होणे; पण ते नामजपादी उपायांनी नियंत्रणात येणे : ऑक्टोबर २०२१ पासून माझ्या डाव्या हाताच्या काखेमध्ये जखम व्हायची. मलम लावले की, बरीही व्हायची. एप्रिल २०२२ मध्ये मला पोटदुखी चालू झाली. त्यानंतर पोटदुखी थांबली की, काखेमधील जखम वाढायची. आधुनिक वैद्यांना जखम दाखवल्यावर त्यांनी नामजपादी उपाय विचारून घेण्यास सांगितले. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपामुळे जखम दोन दिवसांत बरी झाली. त्यानंतर जखम बरी झाली की, पोटदुखी चालू व्हायची. (या दोन्ही त्रासांवर मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजप दिले होते.) याच्या जोडीला मला मानेच्या मणक्यांना सूज येणे (स्पॉन्डिलायटीस) हा त्रासही पुष्कळ होत होता. त्यामुळे माझ्या तोल जाण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.
४ आ. वैद्यांनी ‘कुठे गाठ आहे का पहा ?’, असे सांगितल्यावर १० वर्षांपूर्वी एका वैद्यांनी ‘मला स्तनाचा कर्करोग (‘ब्रेस्ट कॅन्सर’) आहे’, असे सांगितल्याचे स्मरण होणे : एकदा काखेतील जखम वाढल्यावर मी वैद्य मेघराज पराडकर यांना त्याविषयी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘कुठे गाठ आहे का पहा ?’’ तेव्हा मला आठवले की, साधारण १० वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील एक वैद्य आले होते. त्यांना आध्यात्मिक त्रासही लक्षात यायचा. नाडी परीक्षा करून ‘ते रुग्णाला कुठला आजार आहे ?’, हे सांगत असत. माझी नाडी परीक्षा झाल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मला स्तनाचा कर्करोग (‘ब्रेस्ट कॅन्सर’) आहे.’’ तेव्हा आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांनी माझी तपासणीही केली होती; परंतु त्यांना गाठ आढळली नाही. वैद्य मेघराज यांच्या बोलण्याने ‘माझ्या प्रारब्धात स्तनाचा कर्करोग असू शकतो’, हे माझ्या लक्षात आले.
४ इ. कर्करोग होऊ शकतो, हे सहजतेने स्वीकारले जाणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘आपण साधनेनेच ही गाठ कशी वितळेल, हे पाहू’, असे सांगून आश्वस्त करणे : त्याच दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आल्याने मी त्यांना वरील त्रास आणि वैद्य मेघराज यांचे मत सांगितले. त्यांनी सूक्ष्मातून पाहिल्यावर त्यांना काखेतील रेषेत छातीच्या एका ठिकाणी त्रास जाणवला. त्यांनी तिथे दाबून पहायला सांगितल्यावर मला काहीच जाणवले नाही. त्यांनी माझी काखेतील जखम, पोटदुखी आणि छातीवरील हे स्थान यांचा परस्परसंबंध असल्याचे सांगितले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘माझ्या प्रारब्धात कर्करोग आहे, हे मी स्वीकारले आहे; परंतु ‘तो सुसह्य होईल’, यासाठी मी काय करू ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण साधनेनेच ही गाठ कशी वितळेल, हे पाहू.’’
४ ई. नामजपादी उपाय केल्यावर त्रासात वाढ होणे आणि आठ दिवसांनी तीव्रता न्यून होणे : त्यानंतर त्यांनी मला ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप आठ दिवस करून ‘काय जाणवते ?’, ते कळवण्यास सांगितले. दुसर्याच दिवशी माझ्या डाव्या काखेमधील जखम पुष्कळ वाढली आणि मला हात हलवणेही शक्य होईना, तसेच त्यांनी सांगितलेल्या छातीवरील स्थानावर पुष्कळ वेदना होऊ लागल्या. आधुनिक वैद्यांनी सूज आल्यामुळे मला त्रास होत असल्याचे सांगून त्यासाठी औषधे दिली. त्या वेळी सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेल्या नामजपामुळे तिथला त्रास बाहेर पडत असल्याचे माझ्या लक्षात आले. आठ दिवसांनी काकांनी मला ‘महाशून्य’ हा नामजप दिला. तेव्हापासून त्रास सुसह्य आहे.
४ उ. एक शिबिरात गाठ नसल्याचे लक्षात येणे; परंतु सद्गुरु काकांनी नामजप चालू ठेवण्यास सांगणे : मध्यंतरी रामनाथी येथे शासनाच्या वतीने झालेल्या एका शिबिरात ‘स्तनाचा कर्करोग (‘ब्रेस्ट कॅन्सर’) आहे का ?’, याची तपासणी करण्यात आली. तेव्हा मला गाठ नसल्याचे निदान झाले. मी सद्गुरु काकांना याविषयी कळवले आणि स्थानावर अजून काही प्रमाणात वेदना होत असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी ‘महाशून्य’ हा नामजप चालू ठेवण्यास सांगितले.
पूर्वी जीवनात छोटेसे तरंग उठले, तरी माझे मन ते स्वीकारत नसे; परंतु या वेळी माझे मन स्थिर होते. माझ्या मनात ‘मला कर्करोग झाला, तर ‘वेदना सहन करणे, ही माझी साधना असेल’ आणि सद्गुरु काकांनी आश्वस्त केल्याप्रमाणे नाही झाला, तर ‘शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणे, ही माझी साधना असेल’, असा विचार आला.
५. लिखाण लिहून दिल्यावर २ दिवसांत झालेले लाभ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वरील त्रास लिहून दिल्यावर त्यांनी त्रासातील आध्यात्मिक अडथळे दूर केल्याने मला पुढील लाभ झाले.
५ अ. शारीरिक : माझ्या काखेतील जखम ९५ टक्के बरी झाली. इतर शारीरिक त्रासांची तीव्रता ५० टक्क्यांनी उणावली.
५ आ. मानसिक : नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होऊ लागला.
५ इ. आध्यात्मिक : देवाचे अनुसंधान वाढले आणि माझ्या आनंदात वाढ झाली.
६. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, इतक्या वाईट स्थितीत आपण मला सांभाळलेत; म्हणून मी काही प्रमाणात साधना करू शकत आहे. माझ्या बर्याच त्रासांसाठी वैद्यांनाही उपाय सापडत नाहीत; पण आपण मला लढण्यासाठी सद्गुरु गाडगीळकाका दिल्यामुळे मी काही प्रमाणात लढू शकत आहे. गेली १५ वर्षे मी कशी जगत आहे, हे मला आणि देवाला माहीत ! कोणालाच त्याची तीव्रता लक्षात यायची नाही. ‘मला मानसिक स्तरावर हाताळतात; म्हणून माझी प्रगती होत नाही’, असे काहींना वाटते. इतक्या वाईट स्थितीत मी आध्यात्मिक प्रगतीचा विचारच करू शकत नाही. माझ्या या अशा स्थितीतही आपण मला सर्व कर्तव्यांतून मुक्त करून माझ्याकडून साधना करून घेत आहात, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. आपल्या कृपेमुळेच साधकही मला चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
७. आत्मनिवेदन
प.पू., आता केवळ विचार नको, तर माझ्याकडून कृती करून घ्या. माझी प्रगती होवो न होवो, मला मोक्ष मिळो न मिळो, मला अखंड देवाच्या अनुसंधानात रहाणे, त्याच्यासाठी जगणे, प्रत्येक श्वास देवासाठी घेणे अनुभवता येऊ दे. या जन्मी हे अशक्य आहे, यासाठी मला पुन्हा जन्म मिळावा. अशी स्थिती पुढील जन्मी अनुभवता येण्यासाठी माझ्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत साधना करून घ्या, हीच आर्त विनवणी !
– सौ. छाया विवेक नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२२)