साळेल (मालवण, सिंधुदुर्ग) येथील दुर्लक्षित शिवकालीन विहिरीची ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांच्याकडून स्वच्छता
मालवण – तालुक्यातील साळेल येथील एस्.टी. बस थांब्याजवळ असलेली ‘पोखरबाव’ अर्थात शिवकालीन विहीर गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिली होती. हा शिवकालीन ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांसह शिवप्रेमी यांनी श्रमदान करून पहिल्या टप्यात विहिरीसह परिसराची डागडुजी आणि साफसफाई केली.
माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच कमलाकर गावडे, ‘सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर’चे डॉ. कमलेश चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी पोफळे, पत्रकार सिद्धेश आचरेकर यांच्या संकल्पनेतून श्रमदान मोहीम राबवण्यात आली. या वेळी समाजातील विविध स्तरांतील व्यक्ती, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, दुर्गवीर प्रतिष्ठान, दुर्गमावळा प्रतिष्ठान, शिवप्रेमी, पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि साळेल ग्रामस्थ सहभागी झाले होते. झाडाझुडपांमुळे ही विहीर आणि परिसर वेढला होता. त्यामुळे विहिरीचे बांधकाम ढासळत चालले होते. त्यामुळे वाढलेली झाडे कापण्यात आली.
‘विहिरीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी साळेलवासीय आणि शिवप्रेमी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणार्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन विहिरीला प्रकाशझोतात आणण्यासाठी ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ’ पुढाकार घेईल’, असे महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले. साळेल गाव पर्यटन नकाशावर आणण्याच्या दृष्टीने येणार्या काळात नियोजन केले जाणार आहे. या विहिरीची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर नोंद घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रतिवर्षी येथे दीपोत्सवही साजरा करण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. शिवकालीन विहिरींचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीत पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या असतात. कुडाळ शहरातही अशाप्रकारे ‘घोडेबाव’ विहीर आहे.