घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याविषयी मंत्री अतुल सावे यांचा सकारात्मक प्रतिसाद !
|
नागपूर – महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (‘महाज्योती’) विद्यार्थ्यांसाठीच्या ‘टॅबलेट’ खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता अनामत रक्कम (ई.एम्.डी.) न भरणार्या आस्थापनाला पुरवठा आदेश दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासंदर्भात बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडेही सर्व पुरावे पाठवून तशी मागणी केली आहे, अशी माहिती भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी १९ सप्टेंबर या दिवशी दिली.
१. महाज्योती संस्थेकडून ‘एम्.पी.एस्.सी.’ आणि ‘यू.पी.एस्.सी.’सह, ‘जेईई’, ‘नीट’ आदी परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते; मात्र कोरोनाच्या काळात ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण चालू असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘टॅबलेट’ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
२. त्यासाठी सरकारी ई-मार्केटप्लेस (जे.ई.एम्.) या संकेतस्थळावर ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. निविदेनंतर संबंधित आस्थापनाकडून ‘महाज्योती’ संस्थेने ६ सहस्र ‘लिनोवो’ आस्थापनाचे टॅबलेट विकत घेतले.
३. यासाठी संस्थेने सर्व प्रकारचे कर जोडून ११ कोटी ३३ लाख ९४ सहस्र रुपये संबंधित विक्रेत्याला दिले. यानुसार संस्थेने प्रतिटॅबलेट १८ सहस्र ८९९ रुपयांना विकत घेतले.
४. हा करार सप्टेंबर २०२१ मध्ये झाला असून ‘महाज्योती’ने विद्यार्थ्यांना दिलेल्या ‘लिनोवो टॅबलेट’च्या आजच्या आणि तेव्हाच्या किमतीची चौकशी केली असता ती १० ते ११ सहस्र रुपये इतकी असल्याचे लक्षात आले.
५. वर्ष २०२१-२२ मध्ये पुन्हा एकदा ‘महाज्योती’ संस्थेने जवळपास १२ सहस्र ‘टॅबलेट’ खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून यामध्येही गैरव्यवहार झाला आहे.
६. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य लोक यांनी पुरवठादार आस्थापनाशी संगनमत करून ‘टॅबलेट’ खरेदीमधून कोट्यवधी रुपयांचा अपप्रकार केल्याने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आमदार खोपडे यांनी केली आहे.