पत्राचाळ भ्रष्टाचारातील शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध चौकशी करा !
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी !
मुंबई – पत्राचाळीमध्ये ‘गुरुआशिष कन्स्ट्रक्शन’ आस्थापनाला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. त्यामुळे या भ्रष्टाचारातील शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रामध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांसह संजय राऊत अन् शिवसेना यांचा काय संबंध होता ? याचीही कालबद्ध चौकशी करावी. याविषयी म्हाडा निर्णय घेत असतांना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळे या चौकशीचे धागेदोरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत. मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यातील सत्य बाहेर येण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करून ही चौकशी कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावी.