राज्यातील आमदार-खासदारांना सुरक्षा देण्यासाठी ‘विशेष सुरक्षा विभागा’त मनुष्यबळाची कमतरता !
पुणे – येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर झालेल्या आक्रमण प्रकरणाचा गोपनीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी नव्याने सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच शिवसेनेतील बंडामुळे ५४ आमदार-खासदार यांना ‘वाय प्लस एस्कॉर्ट’ सुरक्षा पुरवण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागत असल्याने विशेष सुरक्षा विभागात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे, अशी स्वीकृती कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आपल्या आदेशामध्ये दिली आहे.
सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता भरून काढण्यासाठी विशेष सुरक्षा विभागात यापूर्वी काम केलेले ‘जलद प्रतिसाद दल’ आणि ‘फोर्स वन’मधील काही अधिकार्यांना या सेवेसाठी पाचारण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटातील तणाव पहाता या राजकारण्यांची सुरक्षा करतांना यंत्रणेची तारांबळ होत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. त्यातून ‘विशेष सुरक्षा विभागा’वर ताणतणाव वाढल्याची माहिती महानिरीक्षकांनी आदेशामध्ये दिली आहे.
संपादकीय भूमिकाविशेष सुरक्षा विभागासारख्या महत्त्वाच्या विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता असणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. विभागाची स्थिती अशी का आहे ? याच्या मुळाशी जाऊन मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्यक ! |