राज्यातील ७५ नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
राज्यात नदी महोत्सवाचे आयोजन
मुंबई – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी नदी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरपासून वर्धा येथे या महोत्सवाचा शुभारंभ होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. याविषयी १९ सप्टेंबर या दिवशी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी मुनगंटीवार म्हणाले, ‘‘नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांचे साहाय्य घेण्यात येणार आहे. या कार्यात जलसंपदा, जलसंधारण, वन आदी विभाग जोडले जाणार आहेत. ७५ नद्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयासाठी एका अधिकार्याची नियुक्ती केली जाणार आहे.’’
या वेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी आपल्या सर्वांसाठी नद्यांचे प्रदूषण थांबवणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या बैठकीला वर्धा येथील आमदार पंकज भोयर, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांसह सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ सेवाग्राम येथून !जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, या दृष्टीने गांधी यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर या दिवशी सेवाग्राम येथून होणार आहे. या अभियानात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी केले. |