ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत सर्व ठिकाणी दुर्गापूजा करण्यात येते. त्याची सिद्धताही सर्वत्र चालू झाली आहे. बंगाल शहरातील नवरात्रोत्सव मंडळांनी त्यासाठी पूजामंडप उभारण्यास प्रारंभ केला आहे. तेथील ‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर पूजामंडपाची सजावट करते. गेल्या वर्षी त्यांनी दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’च्या धर्तीवर भव्य मंडप उभारला होता. हा क्लब यंदा ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर मंडपाची सजावट करणार आहे. ‘व्हॅटिकन सिटी’ हे इटली देशातील रोममधील छोटे शहर आहे. ते रोमन कॅथॉलिक चर्चचे मुख्य केंद्र आहे. बंगाल राज्याचे अग्नीशमनमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार सुजित बसू हे या क्लबच्या पूजा समितीचे आयोजक आहेत. येथे प्रश्न असा पडतो की, दुर्गापूजा म्हणजे हिंदूंचा उत्सव आहे, तर त्यात ख्रिस्त्यांच्या चर्चच्या शहराचा देखावा करण्यात काय अर्थ आहे ? भारत देश जरी धर्मनिरपेक्ष असला, तरी हिंदूंच्या सण-उत्सवात ख्रिस्त्यांचा गौरव कशासाठी ? अन्य धर्मीय मग ते मुसलमान असोत किंवा ख्रिस्ती असोत, ते कधी त्यांच्या सणांच्या काळात हिंदू, हिंदु संस्कृती किंवा परंपरा यांचा विचार करतात का ? किंवा त्या धर्तीवर सण-उत्सव साजरे करतात का ? याचा आयोजकांनी गांभीर्याने विचार करावा.
दुर्गापूजेसाठीच्या मंडपात खरेतर हिंदूंच्याच देवतांविषयीचे देखावे असायला हवेत किंवा भारतभूमीला गौरवास्पद ठरणारी एखादी संकल्पनाही देखावा स्वरूपात साकारता येऊ शकते. भारतातील सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक यांच्या जोडीला संरक्षणदृष्ट्या केल्या जाणाऱ्या विविध गोष्टी देखावा म्हणून उभारल्या जाऊ शकल्या असत्या; पण आपल्या देशातील संस्कृती सोडून अन्य देशांतील संस्कृतीचे गुणगान का करायचे ? समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा आजही भारतात नांदत आहेत. भारताला कलेचा प्राचीन वारसाही लाभलेला आहे. हे सर्व आपण समाजासमोर कधी आणणार ? भारतातील संकल्पना कालौघात दडपून टाकायच्या आणि अन्य देश, तेथील संस्कृती यांचा गौरव करायचा, हा कुठला देशाभिमान ? ‘भारतात ‘व्हॅटिकन सिटी’चा देखावा उभारण्याचे आयोजन करणाऱ्यांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम तसूभर तरी आहे का ?’, हा प्रश्नच पडतो. ‘येणाऱ्या नव्या पिढीने काय इटली आणि रोम यांचा उदोउदो करावा’, असे आयोजकांना वाटते का ?
धर्माभिमानशून्यता !
‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. खरेतर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भारतातील एखाद्या भव्यदिव्य मंदिराचा किंवा तीर्थक्षेत्राचा देखावा साकारला असता, तर पूजामंडपात येणाऱ्या भाविकांनाही अभिमान वाटला असता. ख्रिस्ती संस्कृतीचे उदात्तीकरण करण्यापेक्षा दुर्गेची विविध रूपे, त्यांची माहिती, दुर्गामातेने विविध रूपांत केलेली युद्धे, असुरांचा संहार यांविषयीचे देखावे साकारले असते, तर खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सव साजरा केल्यासारखे झाले असते. या माध्यमातून खरेतर भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वभरात पुन्हा एकदा रुजवण्याची सुवर्णसंधी होती; पण आयोजक आणि ‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ यांनी ती गमावली. देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते. हिंदूंच्या देवतांचा पूजामंडप सजवण्यासाठी ख्रिस्त्यांच्या चर्चच्या शहराचा देखावा ठेवला जाणे, हे धर्मांतराचे छुपे षड्यंत्र नसेल कशावरून ? यादृष्टीनेही विचार व्हायला हवा.
अपप्रकारांची साखळी कोण रोखणार ?
बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हिंदूंनी उत्सवप्रिय असणे हे चांगलेच आहे; पण याच काळात मोठ्या प्रमाणात अपप्रकारही होत आहेत. उत्सव साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी थांबून लोकांकडून बळजोरीने दान मागितले जाणे, रस्ते बंद करून, तसेच मोठमोठ्या चौकांत भव्यदिव्य मंडप बांधून रहदारीस असुविधा निर्माण करणे, उद्यानांमध्ये मंडप उभारून तेथील हिरवळ नष्ट करणे किंवा पर्यावरणाची हानी करणे, पूजामंडपात कृत्रिम सजावट, विद्युत् रोषणाई आणि मोठ्या आवाजातील संगीत यातून प्रदूषण होणे, एखाद्या संकल्पनेवर आधारित किंवा टाकाऊ पदार्थांपासून अशास्त्रीयरित्या दुर्गामूर्ती सिद्ध केली जाणे, आधुनिक चित्रपटातील गाणी आणि अश्लील नृत्य यांचे कार्यक्रम आयोजित करणे, चित्रपट कलाकार किंवा राजकारणी यांच्याकडून फीत कापून उद्घाटन केले जाणे, विसर्जन मिरवणुकीत होणारा गोंधळ, मंडप परिसरात मांसाहारासह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाड्याने देणे असे अनेक अपप्रकारांचे स्वरूप आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारे अपप्रकार कोण आणि कसे थांबवणार ? ९ दिवस गरबा खेळायचा, दुर्गापूजा आणि दुर्गामातेची आरती करायची अन् बाहेर आल्यावर धर्मद्रोही कृतींमध्ये सहभागी व्हायचे. अशाने दुर्गादेवीचा कृपाशीर्वाद भक्तांना कधीतरी लाभेल का ? तिची कृपादृष्टी आपल्यावर कशी होणार ?
धर्मद्वेषी देखावा हटवण्यासाठी प्रयत्न करा !
अजूनही वेळ गेलेली नाही. नवरात्रोत्सवाला काही कालावधी शेष आहे. ‘व्हॅटिकन सिटी’च्या पार्श्वभूमीवर साकारण्यात येणारा देखावा हटवून बंगालमधील धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या देखाव्यांचे सादरीकरण करावे, यासाठी सर्व हिंदू आणि देवीभक्त यांनी ‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ला भाग पाडावे. दुर्गामंडपात केल्या जाणाऱ्या ख्रिस्त्यांच्या उदात्तीकरणाच्या विरोधात आवाज उठवावा. अशा माध्यमातून तरी हिंदूंचे संघटन दाखवण्याची संधी आहे. तसे झाल्यास पुढील वर्षीपासून क्लबकडून अन्य देश आणि अन्य धर्म यांच्या ठिकाणांना प्राधान्य न देता भारतीय संस्कृतीचे उदात्त दर्शन घडवणारे देखावेच साकारले जातील, यात शंका नाही. दुर्गेने असुरांचा संहार केला. तो आदर्श समोर ठेवून हिंदु धर्मात फूट पाडण्याचा विद्वेषी प्रयत्न रोखण्यासाठी दुर्गाभक्तांनी विरोध करणे, हेच त्यांचे धर्मकर्तव्य ठरेल !
दुर्गामंडपात केल्या जाणाऱ्या ख्रिस्त्यांच्या उदात्तीकरणाच्या विरोधात हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवावा ! |