श्री दुर्गादेवीची उपासना
नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।।
श्लोकाचा अर्थ : सर्व मंगलकारकांची मंगलस्वरूप असणारी; स्वतः कल्याणकारी शिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी; अशा हे नारायणीदेवी, तुला माझा नमस्कार असो.
१. भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी !
सर्वस्वरूपी, विश्वस्वामीनी, सर्वसामर्थ्यशाली, अशा आई जगदंबेने कार्यानुमेय श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली अशी विभिन्न रूपे धारण केली. शरणागतांना तात्काळ पावणारी, जे जे मंगल आहे, ते ते प्रदान करणारी, जीवनाला परिपूर्ण करणार्या प्रत्येक गोष्टीचे मूर्तीमंत प्रतीक असलेली, भक्तांच्या हाकेला लवकर धावून येणारी, अशी आई जगदंबेची ख्याती आहे. तिच्या असंख्य भक्तांना तिची अशी प्रचीती आहे.
२. देवीची पूजा कशी करावी ?
देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे. देवीला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडल्याने होणार्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे पूजकामध्ये भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
याविषयीचे अधिक विवेचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
३. उपासनेच्या कृती करण्याच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धती
प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. आदिशक्ती श्री दुर्गादेवी आणि तिची सर्व रूपे (सर्व देवी) यांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृतींविषयी सूत्रे (माहिती) पुढील सारणीत दिली आहेत.
उपासनेची कृती |
कृतीविषयीचे विवेचन |
१. ‘पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला गंध कसे लावावे ? | मध्यमेने आज्ञाचक्रावर एका उभ्या रेषेत गंध लावावे. |
२. देवीला गंध कोणत्या बोटाने लावावे ? | अनामिकेने (करंगळीजवळील बोटाने) लावावे. |
३. फुले वहाणे – अ. कोणती वहावीत ? |
मोगरा, शेवंती, निशिगंध, कमळ किंवा जुई. |
आ. संख्या किती असावी ? | एक किंवा नऊच्या पटीत |
इ. वहाण्याची पद्धत कशी असावी ? | फुलांचे देठ देवीकडे करून वहावीत. |
ई. फुले कोणत्या आकारात वहावीत ? | फुले गोलाकार वाहून गोलातील पोकळी रिकामी ठेवावी. |
४. उदबत्तीने ओवाळणे – अ. तारक उपासनेसाठी उदबत्तीचा कोणता गंध ? |
चंदन, गुलाब, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा, रातराणी किंवा अंबर. |
आ. मारक उपासनेसाठी उदबत्तीचा कोणता गंध ? | हीना किंवा दरबार |
इ. संख्या किती असावी ? | दोन |
ई. ओवाळण्याची पद्धत कशी असावी ? | उदबत्त्या उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यांत धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळाव्यात. |
५. कोणत्या गंधाचे अत्तर अर्पण करावे ? | मोगरा |
६. देवीला न्यूनतम (किमान) किती प्रदक्षिणा घालाव्यात ? | एक किंवा नऊच्या पटीत |
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१.२००५, रात्री ९.४२)
४. विशिष्ट देवीला विशिष्ट फूल वहाण्यामागील शास्त्र
‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा. विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके, म्हणजे त्या देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर फुलांच्या तुलनेत जास्त असते. अशी फुले त्या त्या देवतेच्या मूर्तीला वाहिली, तर ती ती देवतेची मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन त्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. त्यामुळे विशिष्ट देवतेला विशिष्ट फूल वहाण्याला महत्त्व आहे. यानुसार पुढील सारणीत काही देवी आणि त्यांना वहावयाची फुले यांची नावे दिली आहेत.
सारणीत दिलेल्या त्या त्या फुलाच्या गंधाकडे त्या त्या देवीचे तत्त्व आकृष्ट होत असल्याने त्या त्या गंधाची फुले आणि उदबत्त्या वापरल्यामुळेही त्या त्या देवीच्या तत्त्वाचा पूजकाला जास्त लाभ होतो.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.९.२००५, सायं. ६.५५ आणि ७.९.२००५, दु. १२.१४)
देवी |
देवीचे तत्त्व आकृष्ट करून घेणारे फूल |
१. श्री दुर्गा | मोगरा |
२. श्री लक्ष्मी | झेंडू |
३. श्री सप्तशृंगी | कवठी चाफा |
४. श्री शारदा | रातराणी |
५. श्री योगेश्वरी | सोनचाफा |
६. श्री रेणुका | बकुळी |
७. श्री वैष्णोदेवी | निशिगंध |
८. श्री विंध्यवासिनी | कमळ |
९. श्री भवानी | भुईकमळ (केशरी रंगाचे भूमीवर येणारे फूल) |
१०. श्री अंबा | पारिजात |
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’
५. विविध रूपांतील देवीला फुले कशी वहावीत ?
देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत. वर्तुळाकारात फुले वहातांना वर्तुळाचा मधील भाग फुलांनी भरलेला म्हणजे भरीव नसावा. देवीला अत्तर वहातांना ‘मोगरा’ या गंधाचे अत्तर वहावे.
६. देवीला कोणत्या गंधाच्या उदबत्त्या वापराव्या ?
विशिष्ट देवतेचे तत्त्व विशिष्ट गंधाकडे लवकर आकृष्ट होते. चंदन, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा, रातराणी आणि अंबर या गंधांकडे देवीतत्त्व लवकर आकृष्ट होते. यामुळे या गंधांच्या उदबत्त्या देवीच्या उपासनेत वापरल्यास देवीतत्त्वाचा लाभ अधिक प्रमाणात होतो.
७. देवीला उदबत्त्यांनी ओवाळण्याची योग्य पद्धत कोणती ?
देवीच्या सर्व रूपांना भक्तीच्या आरंभीच्या टप्प्यात, म्हणजे द्वैतात असतांना देवतेला दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे. उपासकाने भक्तीच्या पुढच्या टप्प्यात, अद्वैताकडे जाण्यासाठी एका उदबत्तीने ओवाळावे. देवतेला ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळचे बोट आणि अंगठा यांनी धरून ती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.
८. देवीला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?
देवीला प्रदक्षिणा घालतांना विषम संख्येत म्हणजे १, ३, ५, ७ अशा संख्येत घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवीला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.
९. देवीला कुंकूमार्चन करणे !
देवीच्या उपासनेतील ‘कुंकूमार्चन’ हा एक विशेष उपासनाप्रकार होय. देवीचा नामजप करत एकेक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून वहायला आरंभ करून देवीच्या डोक्यापर्यंत वहात येणे अथवा देवीला कुंकवाने स्नान घालणे, म्हणजे ‘कुंकूमार्चन’. कुंकू हे शक्तीरूपी आहे, म्हणजेच कुंकवामध्ये देवीतत्त्व ग्रहण करण्याची क्षमता अधिक आहे. याच कारणाने देवीला ‘कुंकूमार्चन’ केल्यावर देवीच्या मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवामध्ये येते. नंतर ते कुंकू आपण आपल्याला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
याविषयीचे अधिक विवेचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
१०. देवीची ओटी कशी भरावी ?
देवीची ओटी भरतांना ताटात साडी ठेवून त्यावर खण ठेवावा. खणावर नारळ ठेवावा आणि मग ती दोन्ही हातांच्या ओंजळीत घ्यावी. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हाताची ओंजळ छातीच्या समोर येईल, या पद्धतीने उभे राहून देवीकडून चैतन्य मिळण्यासाठी आणि साधनेत प्रगती होण्यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करून खण, साडी आणि नारळ देवीच्या चरणी अर्पण करावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवल्याने, नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होऊन ते खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते.
याविषयीचे अधिक विवेचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
११. देवीच्या चरणांवरील वस्त्र परिधान करण्यामागील लाभ कोणते ?
ओटी भरल्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळही प्रसाद म्हणून खावा. देवीचा प्रसाद म्हणून ते वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन देहाची शुद्धी होते. देवीप्रती आपला भाव जेवढा अधिक असेल, तेवढा अधिक काळ देवीकडून मिळालेली सात्त्विकता टिकते.
देवीच्या उपासनेविषयीची ही माहिती आपल्याला भावजागृती आणि
राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी प्रोत्साहित करणारी ठरो, हीच देवीच्या चरणी प्रार्थना !
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाचे शास्त्र’
(सौजन्य : परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी – सनातन संस्था)
देवीपूजनाशी संबंधित अधिक माहितीसाठी वाचा,१. ‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र |