नियमितपणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने यजमानांचा कर्करोग आणि ‘ब्राँकायटिस’ पूर्ण बरा झाल्याची आलेली अनुभूती
१. कर्करोग आणि ‘ब्राँकायटिस’ यांमुळे यजमानांची प्रकृती खालावणे
१ अ. यजमानांना कर्करोग झाल्याने त्यांची शारीरिक स्थिती खालावणे : ‘माझ्या यजमानांचे वय ७४ वर्षे आहे. वर्ष २०१९ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांचे शस्त्रकर्म करावे लागले. त्यांना चालणे-फिरणे, तसेच इतर शारीरिक हालचाली करणेही अवघड वाटत होते. त्यांना सतत अशक्तपणा जाणवत होता. थोडे श्रम केल्यावरही त्यांना विश्रांती घ्यावी लागत होती. त्यामुळे ते सारखे झोपून रहात असत.
१ आ. यजमानांना ‘ब्राँकायटिस’मुळे खोकल्याचाही तीव्र त्रास होणे : त्यांना ६ वर्षांपूर्वी ‘ब्राँकायटिस’चा (फुप्फुसांतील श्वासनलिकांना सूज येण्याचा) त्रास चालू झाला होता. अनेक आधुनिक वैद्यांकडे जाऊन औषधोपचार करूनही त्यांना पावसाळा, हिवाळा किंवा अधूनमधूनही ‘ब्राँकायटिस’मुळे खोकल्याचा तीव्र त्रास होत होता.
२. अनेक वर्षे सांगूनही नामजप न करणार्या यजमानांचा दळणवळण बंदीच्या काळात अकस्मात् दत्ताचा नामजप चालू होणे आणि त्यानंतर त्यांचा ‘ब्राँकायटिस’चा त्रास वेगाने न्यून होणे
मी गेल्या अनेक वर्षांपासून यजमानांना नामजप करण्यास सांगत होते; पण त्यांच्याकडून नामजप होत नव्हता. मग मी ‘त्यांनी नामजप करावा’, हा अट्टाहास सोडून दिला. दळणवळण बंदीच्या काळात अकस्मात् त्यांचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू झाला. त्यांचा नामजप आरंभी १ घंटा, नंतर २ घंटे, असे करत अखंड होऊ लागला. ते घरची देवपूजा प्रतिदिन नियमितपणे करू लागले. ते तिन्हीसांजेला संपूर्ण घरात उदबत्ती फिरवून नियमित वास्तूशुद्धी करू लागले. परिणामस्वरूप त्यांना होणारा ‘ब्राँकायटिस’चा त्रास वेगाने न्यून झाला आणि लवकरच समूळ नष्ट झाला. त्यांचा खोकलाही पूर्णपणे बंद झाला. हळूहळू त्यांना पंख्याखाली, तसेच वातानुकूलन यंत्राच्या जवळ बसूनही खोकल्याचा त्रास होणे बंद झाले.
३. हळूहळू आहार वाढून अशक्तपणा नाहीसा होणे
त्यांना त्रासामुळे जेवणसुद्धा जात नव्हते. जेवतांना ते थोडेच अन्न ग्रहण करायचे; म्हणून मी त्यांना आवडणारे वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांना खायला द्यायचे. हळूहळू त्यांना जेवण जाऊ लागले आणि त्यांचा आहार वाढला. लवकरच त्यांना अशक्तपणा जाणवणे न्यून झाले.
४. चालणे वाढणे आणि हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत चालू होऊन आत्मविश्वासात वाढ होणे
दळणवळण बंदीच्या काळात घराबाहेर संकुलाच्या आत फिरण्यास अनुमती होती. यजमानांचे संकुलात फिरणे चालू झाले. हळूहळू त्यांचे चालणे वाढले. ते जवळच्या दुकानातून भाजी आणू लागले. नंतर त्यांचे कामानिमित्त अधिकोषात जाणेही चालू झाले. हळूहळू त्यांचे सर्वच व्यवहार सुरळीत चालू होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला.
५. गुरुकृपेने कर्करोग बरा होणे
त्यांच्या कर्करोगाच्या पुढील तपासण्यांचे अहवाल चांगले आले. आज माझे यजमान श्री गुरुकृपेने पूर्ण स्वस्थ जीवन आनंदाने जगत आहेत.
६. नियमितपणे नामजप केल्याने यजमानांमध्ये जाणवलेले पालट
अ. त्यांचा नामजपावरील विश्वास दृढ झाला आहे. आजमितीला त्यांचा नामजप नियमितपणे चालू आहे. नामजपाने त्यांच्या मुखावर बराच पालट दिसत आहे.
आ. त्यांचा तोंडवळा सात्त्विक वाटत आहे.
इ. त्यांच्या डोळ्यांत पालट होऊन त्यांत शांतपणा जाणवत आहे.
ई. त्यांची कांती थोडी उजळली असून त्यांच्या बोलण्यातही सौम्यता आली आहे.
‘श्री गुरुकृपेने मला ही पुष्कळ मोठी अनुभूती आली’, याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मीना सुनील चौबळ (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२१)
|