अन्याय होत असलेल्यांना मनापासून साहाय्य करणारे संभाजीनगर येथील पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७७ वर्षे) !
संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास…
‘आयुष्याच्या उतारवयात ध्यानीमनी नसतांना ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक प्रसार आणि प्रचार करणार्या संस्थेशी कधी काळी माझा संबंध येईल’, असे मला वाटले नव्हते. या लेखामध्ये माझा ‘मी काही विशेष केले आहे’, असे सांगण्याचा अभिनिवेश मुळीच नाही.
१. जन्म आणि बालपण
१ अ. हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होण्यासाठी झालेल्या संग्रामात वडिलांचा पूर्ण सहभाग असणे : २७ मे १९४५ या दिवशी माझा जन्म जिल्हा बीड येथे झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात, त्यातही भारत स्वतंत्र होऊनही आमचे हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात सामील झाले नव्हते. स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक घरादाराचा त्याग करून आपापल्या परीने निजाम शासनाला विरोध करत होते. त्यात माझे वडील श्री. पुरुषोत्तमराव चपळगावकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. मला बालपणी वडिलांचा सहवास मिळालाच नाही; कारण हैद्राबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी स्वतंत्र झाल्यानंतर काही काळाने त्यांना कारागृहातून सोडण्यात आले. तोपर्यंत त्यांनी स्वतःला भाषणे, अटक, शिक्षा आणि कारागृह यांतच अडकवून घेतले होते.
पुढे १५.८.१९७२ या दिवशी त्यांचा देहली येथे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते ताम्रपट आणि चांदीचे कडे देऊन सत्कार करण्यात आला अन् त्यांना तहहयात निवृत्तीवेतन देण्यात आले.
१ आ. घरामध्ये धार्मिक कर्मकांड फारसे नसले, तरी घरात सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले जाणे : या कौटुंबिक पार्श्वभूमीत मी वाढत गेलो. वडील अत्यंत न्यायप्रिय असल्याने साहजिकच माझा स्वभावही तसाच होत गेला, हे साहजिक आहे. माझे वडील हे कडवे गांधीवादी विचारांचे होते. घरामध्ये धार्मिक कर्मकांड फारसे नसले, तरी सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घरात व्यवस्थित पार पाडले जात. वडील मला वेळोवेळी अनेक सणांचे महत्त्व पटवून देत असत.
२. प्रसंगावधान राखून तत्परतेने कृती केल्यामुळे दुर्घटना टळणे आणि ती घटना वडिलांच्या स्मरणात रहाणे
त्या वेळची एक गोष्ट मला आठवत आहे, ‘घरातील एका मोठ्या दालनामध्ये माझे वडील आणि ज्येष्ठ बंधू असतांना माझ्या बंधूंचा हात ‘टेबललॅम्प’ला चिकटला. माझे बंधू आणि वडीलही मोठ्याने ओरडले. मी बाहेरून पळत आलो आणि हे पाहिले. तेव्हा मी माझ्या हातापाशी असलेले ‘मेन स्विच’ बंद केले आणि धावत जाऊन बंधूंना सावरले. माझे वडील त्यापुढच्या ३५ वर्षांच्या आयुष्यात ही घटना कधीही विसरू शकले नाहीत. ‘‘तू नसतास, तर काय झाले असते ?’’, असा प्रश्न ते मला नेहमी विचारत असत. तेव्हा मी त्यांना शांतपणे उत्तर देत असे, ‘‘मी नसतो, तर ही घटनाच घडली नसती.’’
३. ‘ज्यांना साहाय्याला कुणी नाही’, अशा पक्षकारांना कायदा आणि नियम यांच्या चौकटीत राहून न्यायदान करणे
पुढे माझे वडील, थोरले बंधू (श्री. नरेंद्र चपळगावकर (वय ८४ वर्षे), ते पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले) आणि मी असे तीन अधिवक्ते एकाच घरात काम करू लागलो. ‘मी न्यायाधीश व्हावे’, अशी माझे वडील आणि माझी पत्नी यांची इच्छा होती. वर्ष १९७६ मध्ये सुदैवाने पहिल्याच प्रयत्नात मी न्यायाधीश झालो. काम करतांना ‘ज्यांना कोणी नाही’, अशा पक्षकारांना ते आरोपी असले, तरी मी कायदा आणि नियम यांच्या चौकटीत राहून न्याय देत राहिलो. यात विशेषतः जन्मतः टाकून दिलेली बाळे, बालसुधारगृह, कारागृह, तसेच वेड्यांचे इस्पितळ यांत मी विशेष लक्ष घालत असे.
४. स्वेच्छानिवृत्ती आणि सनातन संस्थेशी झालेला संपर्क !
४ अ. स्वेच्छानिवृत्ती घेऊन वकिली व्यवसायाला प्रारंभ करणे : निवृत्तीवेतनपात्र सेवा झाल्यानंतर मी स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेली विनंती शासनाने मान्य केली; पण त्यासाठी मला संघर्ष करावा लागला. त्यानंतर वर्ष १९९७ मध्ये मी संभाजीनगरच्या (औरंगाबादच्या) मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात वकिली व्यवसायाला प्रारंभ केला. त्यासाठी मला पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचे मिळालेले प्राथमिक मार्गदर्शन मोलाचे होते. ते माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या सोबत वकिली व्यवसायात होते. रोजच्या भेटीत त्यांच्याकडून मला सनातन संस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील कार्याची माहिती मिळत होती.
४ आ. निवृत्तीनंतर समाजकार्य करण्याची इच्छा असणे : निवृत्तीनंतर ‘परमेश्वराने जन्मतःच आपल्यासोबत जे काही दिले आहे, त्याचा उपयोग समाजासाठी (सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक) करावा’, अशी माझी इच्छा होती. त्याचबरोबर ‘आपला कोणी वापर करून घेऊ नये’, याचीही जाण मला सोबत होती.
५. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चालवलेल्या ‘वैज्ञानिक जाणिवा’ चळवळीच्या विरोधात केलेले काम !
५ अ. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘वैज्ञानिक जाणिवा’ या गोंडस नावाखाली व्याख्याने देऊन त्यात भारतीय संस्कृती, साधू आणि संत इत्यादींचा अनादर करत असणे, त्याविषयी एका धर्मप्रेमीने न्यायालयात दाखल केलेला खटला चालवणे : अशाच वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘वैज्ञानिक जाणिवा’ या गोंडस नावाखाली शैक्षणिक संस्थांसह इतर ठिकाणी शासनाच्या आर्थिक साहाय्याने व्याख्याने देत असे. त्या व्याख्यानात ते भारतीय संस्कृती, साधू, संत, रितीरिवाज अशा आदरणीय आणि श्रद्धेय विषयांचा अनुदारतेने उल्लेख करत असत. एका संस्थेमध्ये झालेल्या अशाच कार्यक्रमाबाबत एका धर्मप्रेमीने त्या ठिकाणच्या न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली.
५ अ १. धर्मप्रेमीचे न्यायालयीन काम पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्याकडे येणे, ती कागदपत्रे वाचतांना ‘तो खटला स्वतःच चालवावा’, असे वाटणे : साहजिकच धर्मप्रेमीचे न्यायालयीन काम पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्याकडे आले. या प्रकरणातील कागदपत्रे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पहात असतांना मी त्यांच्या हातून ती कागदपत्रे काढून घेतली आणि स्वतः चाळून पाहिली. तेव्हा ‘हे प्रकरण स्वतःच चालवावे’, अशी मला तीव्रतेने आंतरिक इच्छा उफाळून आली.
५ अ २. ‘अध्यात्म’ ही संकल्पना श्रीमद्भगवद्गीतेमध्ये कुठे कुठे वापरली आहे ?’, हे न्यायालयात सांगितल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षांच्या विरोधातील खटला पुढे चालू रहाणे : त्या काळी मी नियमित श्रीमद्भगवद्गीता वाचत असे. न्यायालयासमोर ते प्रकरण चालवतांना ‘अध्यात्म’ ही संकल्पना ‘श्रीमद्भगवद्गीतेमध्ये कुठे कुठे वापरली आहे ?’, हे मला न्यायालयात सांगता आले. साहजिकच ‘अशी भाषणे करणार्या त्या जिल्हाध्यक्षांच्या विरुद्ध खटला पुढे चालू ठेवावा’, असा आदेश न्यायालयाने दिला.
त्यानंतर ‘अशी काही प्रकरणे असल्यास ती मी चालवणार’, असे मी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना सांगितले.
५ आ. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने श्री गणेशमूर्तींविषयी दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधातील पुरावे पाहून न्यायालयाने याचिका निकाली काढणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक याचिका (औरंगाबाद) संभाजीनगर खंडपिठात दाखल केली होती. त्यात ‘गणपतीची मूर्ती ६ इंचांपेक्षा मोठी असू नये’, अशी मागणी करण्यात आली होती. ‘गणपतीच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग हे विषारी असल्यामुळे गणपति विसर्जनानंतर पाण्यात पसरलेल्या विषामुळे मासे मरतात आणि मूर्ती विसर्जनामुळे धरणामध्ये माती साचून धरणे निकामी होतात’, अशी कारणे देण्यात आली होती. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी भरपूर कष्ट घेऊन याबाबतची सर्व माहिती पुराव्यानिशी गोळा केली होती. माननीय न्यायालयाने आम्हा दोघांचेही (पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी आणि मी) म्हणणे ऐकून घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीची याचिका निकाली काढली.’
६. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये एका साधिकेला मार्गदर्शन करतांना पाहून ‘स्वतःला सर्वांसमोर बोलायला जमू शकेल’, असे वाटणे आणि पेण येथील मूर्तीकारांसमोर बोलणे : याच काळामध्ये मी संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांना मार्गदर्शन करतांना पाहिले. ‘ही मुलगी इतकी व्यवस्थित बोलू शकते, तर आपल्याला ते का जमणार नाही ?’, असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यानंतर मी आणि इतर साधक यांनी पेण येथे जाऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मूर्तीकारांसमोर भाषणे केली.’
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/614126.html
– (पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर (१८.६.२०२२)