कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी संवादाची आवश्यकता !
समाज विविध समस्यांनी ग्रस्त आहे. अर्थात् कुटुंबापासून समाज बनत असल्याने आज प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतातच ! या समस्यांचा वेध घेणारा आणि त्यावर उपाय सांगणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
१. कौटुंबिक हिंसाचाराचे विविध प्रकार
‘कौटुंबिक हिंसाचार’ या अत्यंत ज्वलंत आणि संवेदनशील विषयावर अजूनही समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. ‘समाज काय म्हणेल ?’, या एका विचारामुळे बहुतांश जण त्रास सहन करत असतात. केवळ स्त्रियाच नाही, तर पुरुष आणि लहान मुलेही याला बळी पडतात. कौटुंबिक हिंसाचार हा केवळ शारीरिक छळ नाही, तर त्यात शाब्दिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक आदींचाही समावेश होतो. विशेषत: अपत्य नसल्यामुळे स्त्रीला हिणवणे किंवा धमकावणे, त्रास देणे असे प्रकार घडतात. तसेच मनाविरुद्ध गर्भधारणेची सक्ती करणे, तिचा जीव धोक्यात घालणे, तिच्या नातेवाइकांकडे हुंड्याची मागणी करणे आदी अनेक गोष्टी कौटुंबिक हिंसाचारात मोडतात.
२. सासर आणि माहेर दोन्हींकडून कोंडी झाल्याने पीडितेकडून टोकाचे पाऊल उचलले जाणे
हिंसाचार करणारी व्यक्ती अट्टल गुन्हेगार नसते. पीडितेचा होणारा छळ हा कुठे चौकात किंवा बाजारात नाही, तर तिच्या स्वत:च्या घरात आणि जवळच्या व्यक्तींकडून केला जातो. या प्रकाराला लहानमोठ्या कुरबुरींपासून प्रारंभ होतो. बर्याचदा स्त्रिया माघार घेतात; पण कोणतीही गोष्ट सहनशीलतेच्या पलीकडे गेली की, त्या माघार घेत नाहीत.
गेल्या काही दिवसांमध्ये मला आलेले दूरभाष आणि त्यांवर झालेले संभाषण यांवरून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. यात कौटुंबिक वाद झाला, तर बहुतांश स्त्रिया माघार घेऊन तडजोड करतात. असे असूनही बर्याचदा तिला सासरचे लोक अपमानित करतात. ‘तुझेच काहीतरी चुकले असेल, तू रागीट आहेस, तू सांभाळून घेतले पाहिजेस’, या गोष्टी तिच्यावर बिंबवल्या जातात. त्रास देणार्यांना मात्र कुणी काही सांगत नाहीत. अशा वेळी पीडितेला माहेरी जावेसे वाटले, तर तेथेही तिला काही गोष्टी ऐकवल्या जातात. काही ठिकाणी तिला माहेरच्यांकडूनही प्रतिसाद मिळत नाही. ‘एवढा खर्च करून घरच्यांनी आपले लग्न लावून दिले, हुंडा दिला, दागिने दिले आणि आता त्यांना काही सांगितले, तर ते सहन होणार नाही’, या भीतीने स्त्रियाही विशेष बोलत नाहीत. अशा वेळी त्यांचा मानसिक त्रास वाढतो. अशी वेळ सतत येत राहिली, तर पती-पत्नीमधील आपुलकी हळूहळू लोप पावू लागते. त्यानंतर वाद विकोपाला जातो. त्यांच्या शारीरिक संबंधांतही तणाव निर्माण होतो. बर्याचदा पीडितेवर बळजोरी होते. त्यामुळे झालेल्या प्रतिकारामुळे हिंसा वाढते. याची परिणती स्त्रीने घर सोडून जाणे, घटस्फोट घेणे किंवा आत्महत्या करणे यांपैकी कशातही होऊ शकते.
३. स्त्रियांप्रमाणे पुरुषही कौटुंबिक हिंसाचाराचे बळी
मी आधी म्हटल्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी या केवळ स्त्रियाच नव्हे, तर कित्येक पुरुषही आहेत. बर्याच वेळा पुरुष आणि त्यांचे कुटुंबीय यांनाही खोट्या आरोपांखाली अडकवले जाते. आपल्या पित्तृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषावर अन्याय आणि अत्याचार होतो, हे कुणी मान्यच करत नाही. त्यामुळे पुरुष याविषयी कुठेही तक्रार करत नाहीत. कुणी यासंदर्भात तक्रार केलीच, तर त्याला ‘तू पुरुषासारखा पुरुष असतांना बायकांसारख्या तक्रारी काय करतोस ? तूच तुझा विषय संपव’, असे म्हटले जाते. त्यातून मन:स्ताप, व्यसन आणि कटकटी यांमुळे घरातील वातावरण बिघडते. कालांतराने हिंसाचारही वाढीस लागतो.
४. कौटुंबिक हिंसाचार नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येकाने घरगुती वाद स्वत:च सोडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक !
दळणवळण बंदीच्या पूर्वी असे समजले जायचे की, पतीपत्नीमध्ये नीट संवाद होत नाही. ते दोघेही त्यांच्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे समज-अपसमज वाढतात. त्यातूनच वाद निर्माण होतात. वास्तवात जेव्हा दळणवळणबंदीमुळे दोघांनाही घरी थांबावे लागले, तेव्हा वेगळेच चित्र पहायला मिळाले. बर्याच ठिकाणी एकमेकांचा अतीसहवासही नकोसा झाला. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. या विषयाने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले. या पार्श्वभूमीवर स्त्रिया आणि बालके यांना संरक्षण मिळावे; म्हणून विविध स्तरांवर काम चालू आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या वाचल्या की, साहजिकच आपल्याला चीड येते आणि ‘हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो’, असा विचार करतो. माझ्या मते, कौटुंबिक हिंसाचारात वाढ होऊ न देण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर प्रयत्न करणे अपेक्षित आहे. हा कौटुंबिक वादाचा विषय असल्याने प्रत्येकाने आपल्या घरातील वाद स्वत: सोडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बर्याच वेळा कौटुंबिक प्रकरण असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करत नाही आणि पीडिताही कुटुंबियांच्या भीतीपोटी कुणाला काही सांगत नाहीत. अशा वेळी आपण पोलिसांकडे तक्रार करावी किंवा सामाजिक संस्थांना कळवावे. यातून पीडितेला साहाय्य मिळू शकते.
५. जीवनात सुख, शांती आणि समाधान टिकवण्यासाठी संयम अन् समजूदारपणा यांची कास धरा !
‘कौटुंबिक हिंसाचार’ या अत्यंत नाजूक आणि भावनिक विषयावर आपण सर्वांशी बोलले पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाने आपापल्या दैनंदिन जीवनात येणार्या समस्यांवर जवळच्या व्यक्तींशी चर्चा केली पाहिजे. यातून अनेक प्रश्न सुटू शकतात. विचारपूर्वक आणि सामंजस्याने केलेले भाष्य लाभदायक ठरू शकते. त्यामुळे निश्चितच आपल्यातील वाद दूर होतील. आपल्यातील चांगला संवाद इतरही कुणाचे आयुष्य सुंदर बनवू शकेल. यातून तुमचे नाते विकसित व्हायला साहाय्य होईल. संवादाचा प्रारंभ लहान लहान गोष्टींमधून होऊ शकतो. त्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नाही. आपल्याला निकड आणि अपेक्षा यांतील भेद (फरक) कळायला पाहिजे. केवळ आवश्यकतांचाच विचार करून त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यास त्या सहज पूर्ण होऊ शकतील. संयम आणि समजूदारपणा यांमुळे आपल्या जीवनात सुख, शांती अन् समाधान टिकून ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. शेवटी कुटुंबाच्या आनंदाविना काहीही महत्त्वाचे नाही, हे मात्र खरे !’
– अधिवक्त्या सुनीता खंडाळे (महिला आणि बाल विषयाच्या अभ्यासिका)
साधनेची अपरिहार्यता !जीवनात प्रत्येकाला समस्या येतात. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक, तसेच परस्पर सहकार्याची भावना असेल, तर त्यातूनही मार्ग काढता येतो. हे सध्या करण्यासाठी व्यक्तीची सद्सद्विवेकबुद्धी असणे आवश्यक आहे. स्वतःचे मनोबल टिकवून एकमेकांना समजून घेणे, हे साधण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव उपाय आहे. देवाला श्रद्धापूर्वक प्रार्थना करणे आणि नामजप करणे यांमुळे मनाची सकारात्मक शक्ती वाढते तसेच विवेकबुद्धीही जागृत होते. कुटुंबातील कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि कुटुंबव्यवस्था टिकण्यासाठी साधना करणेच अपरिहार्य आहे ! – संपादक |