देशभरात समान नागरी कायदा लागू करा ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री, गोवा
पुणे येथील ‘एम्.आय.टी.’ वर्ल्ड पेस विद्यापिठाच्या कार्यक्रमात प्रतिपादन
पुणे – गोव्यात समान नागरी कायदा गोवा मुक्तीपासून आहे. समान नागरी कायद्याचा कोणताही धर्म, जात किंवा पात यांच्याशी संबंध नाही. पोर्तुगिजांनी दिलेल्या या कायद्याची गोव्यात प्रभावीपणे कार्यवाही केली जाते. गोव्यात सर्व धर्मांतील लोक या कायद्याचे पालन करून गुण्यागोविंदाने रहातात. समान नागरी कायदा त्वरित देशभर लागू केला पाहिजे, असे आवाहन गोव्याचे कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी केले. पुणे येथील ‘एम्.आय.टी.’ वर्ल्ड पेस विद्यापिठाच्या कार्यक्रमात सहस्रो विद्यार्थ्यांना संबोधित करतांना कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी हे आवाहन केले. ‘एम्.आय.टी.’च्या कार्यक्रमात देशभर समान नागरी कायदा लागू करण्याचा ठराव घ्यावा, असे आवाहनही मंत्री नीलेश काब्राल यांनी केले.
त्यांनी समान नागरी कायद्याचे पुढील लाभ सांगितले.
१. सर्वांना समान अधिकारी मिळाल्याने खर्या अर्थाने ‘सर्वधर्मसमभाव’ (‘सॅक्युलरिझम्’) जपला जाईल.
२. विशेष करून महिलांना अधिकार मिळेल.
३. समाजात फूट पाडणार्या शक्तींना आळा बसेल.
४. वैयक्तिक कायद्यांमुळे खटल्यांची जी संख्या वाढलेली आहे, ती उणावण्यास साहाय्य होईल.
५. राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळेल.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात वर्ष १९१४ पासून जन्म, मृत्यू आणि विवाह यांच्या नोंदी सरकारने जपून ठेवल्या आहेत. समान नागरी कायद्यांतर्गत प्रत्येक विवाहाची नोंद केली जाते. विवाहित महिलांना मालमत्तेचा वाटा मिळतो, तसेच घटस्फोटितांनाही समान अधिकार मिळतो. कायदा अस्तित्वात असल्याने अशा अधिकारांसाठी न्यायालयात जावे लागत नाही. गोवा सरकारने विशेष ‘नोटरी’ची नियुक्ती करून हे काम सोपे केले आहे.’’